Published On : Sun, Mar 1st, 2020

बल्लूजींनी शिक्षणातून विद्यार्थ्यांवर संस्कार केले : नितीन गडकरी

Advertisement

नागपूर: अभाविपचे कार्यकर्ते आणि मराठीचे उत्कृष्ट प्राध्यापक असलेले अरविंद उपाख्य बल्लूजी खांडेकर यांनी शिक्षणातून विद्यार्थी घडविले, विद्यार्थ्यांवर त्यांनी शिक्षणाच्या माध्यमातून संस्कार करून मराठीविषयी गोडी निर्माण केली, असे प्रतिपादन केंद्रीय महामार्ग परिवहन व लघु, मध्यम व सूक्ष्म उद्योग मंत्री नितीन गडकरी यांनी केले.

माधवनगरातील पीएमजी सोसायटीच्या सभागृहात आज बल्लूजी खांडेकर यांचा सहस्रचंद्रदर्शन सत्कार व गौरवांकाच्या प्रकाशनाच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. या कार्यक्रमात अध्यक्ष म्हणून गडकरी बोलत होते. याप्रसंगी प्रमुख अतिथी म्हणून अमरावती विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. मुरलीधर चांदेकर, नागपूर विद्यापीठाच्या राज्यशास्त्र विभाग प्रमुख डॉ. मोहन काशीकर उपस्थित होते.

Gold Rate
15 May 2025
Gold 24 KT 92,100/-
Gold 22 KT 85,700/-
Silver/Kg 94,800/-
Platinum 44,000/-
Recommended rate for Nagpur sarafa Making charges minimum 13% and above

बल्लूजींवरील गौरवांकाचे प्रकाशन याप्रसंगी नितीन गडकरी यांच्या हस्ते करण्यात आले. बल्लूजींचा सत्कार गडकरींच्या हस्ते करण्यात आला. यावेळी त्यांचा 81 सुभाषितांची माळ घालून सन्मान करण्यात आला. या कार्यक्रमात आपल्या भावना व्यक्त करताना गडकरी पुढे म्हणाले- बल्लूजींचे मराठीतील वक्तृत्व असामान्य होते. प्राध्यापक म्हणून त्यांच्या वक्तृत्वाचा विद्यार्थ्यांवर प्रभाव पडत असे. त्यामुळे अनेक विद्यार्थी आणि कार्यकर्ते भविष्यातील उत्तम नागरिक झाले आणि त्यांना चांगला दृष्टिकोन मिळाला.अभाविचा तो काळ अत्यंत कठीण. मानसन्मान प्रतिष्ठा न मिळणारा असताना त्या काळात त्यांनी शैक्षणिक क्षेत्रात अभाविपच्या माध्यमातून काम उभे केले. त्या काळातही विद्यार्थ्यांमध्ये अभाविपचा विचार आणि शैक्षणिक भूमिका त्यांनी रुजवली.

काम करणार्‍यांना त्या काळात खूप अपमान सहन करावे लागले. प्रतिकूल काळात समाजातील विचित्र भाव सहन करावा लागला. विरोधकांना आपला विचार, सत्य आणि स्वरूप सांगून त्यांचे मन बदलवू शकतो. आपला विचार प्रभावीपणे लोकांपर्यंत नेला की परिस्थिती बदलू शकते, याचाच परिणाम असा झाला की संघ आणि अभाविपचा विरोध करणारे अनेकजण बल्लूजीशी जोडले गेले आणि बल्लूजींचा हे लोक आदर करीत असत. विचाराशी कोणताही समझोता न करता आपल्या विचारांची छाप त्यांनी विरोधकांवर सोडली होती. त्यामुळेच त्यांचे जीवन कार्यकर्त्यांसाठी, विद्यार्थ्यांसाठी प्रेरणादायी ठरते. कार्यकर्त्यांनी त्यांच्या जीवनापासून प्रेरणा आणि संस्कार घ्यावा असेही गडकरी म्हणाले.

याप्रसंगी प्रमुख अतिथी डॉ. मुरलीधर चांदेकर यांनीही आपले अनुभव सांगितले. तसेच अ‍ॅड. आनंद परचुरे आणि विशाखा पाठक यांनीही बल्लूजींबद्दल आपल्या भावना व्यक्त केल्या.

या कार्यक्रमाला ज्येष्ठ विचारवंत मा.गो. उपाख्य बाबुराव वैद्य, माजी पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे, डॉ. रामभाऊ तुपकरी व अनेक मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक

सौ. विनया काशीकर यांनी केले तर संचालन प्रकाश एदलाबादकर यांनी केले.

Advertisement
Advertisement
Advertisement