नागरिकांचे महापौरांना निवेदन : रामदासपेठ येथील दगडी पार्कमध्ये ‘वॉक अँड टॉक विथ मेयर’
नागपूर : शहरात सर्वत्र अतिक्रमणाची समस्या आहे. रस्ते, फुटपाथ यासोबतच मैदाने, नालेही अतिक्रमणाच्या विळख्यात आहेत. मात्र याशिवाय घराच्या पुढे रस्त्यावर वाढविलेला उतार, घराच्या बाहेरील बाजूस रस्त्याच्या जागेवर लावलेली झाडे आदी समस्याही अतिक्रणाशी संबंधित आहेत. यावर कठोर निर्णय घेत कायदेशीररित्या संपूर्ण शहरातील अतिक्रमण हटवा, अशी मागणी करणारे निवेदन शुक्रवारी (ता.१३) रामदासपेठ येथील नागरिकांनी महापौर संदीप जोशी यांना दिले.
‘वॉक अँड टॉक विथ मेयर’ या उपक्रमांतर्गत शुक्रवारी (ता.१३) सकाळी महापौर संदीप जोशी यांनी रामदासपेठ येथील दगडी पार्कमध्ये नागरिकांशी संवाद साधला. याप्रसंगी ज्येष्ठ नगरसेवक संजय बंगाले, नगरसेविका रूपा राय, उद्यान अधीक्षक अमोल चौरपगार, रामदासपेठ असोसिएशनचे सचिव सचिन पुनियानी, उपाध्यक्ष सुनीता सोनी, मीना सराफ, हरजीत बग्गा आदी उपस्थित होते. यावेळी नागरिकांनी महापौरांना अतिक्रमणासंदर्भात निवेदन सादर केले.
याशिवाय नागरिकांनी अन्य समस्यांचाही पाढा महापौरांपुढे वाचला. रमेश छाबरा यांनी रामदासपेठ येथील कुत्र्यांची समस्या व दगडी पार्क उद्यानातील प्रसाधनगृहातील अस्वच्छतेबाबत अवगत केले. डॉ. जगन्नाथ मोरोडीया यांनी उद्यानाची देखरेख उत्तम असली तरी उद्यानात आवश्यक दुरूस्त्या तातडीने करणे तसेच ग्रीन जिममधीलही साधनांची दुरूस्ती करण्याची मागणी केली. शहरात सर्वत्र तयार करण्यात येत असलेल्या सिमेंट रोडची डांबर रोडच्या तुलनेत उंची जास्त आहे. त्यामुळे वाहन उसळी घेतो. याकरिता रस्ते बांधताना ते समतल असावेत याकडे लक्ष देण्याबाबत सूचना यावेळी मांडण्यात आली.
काछीपुरा येथील मलवाहिनीची अवस्था वाईट आहे. पावसाळ्यामध्ये परिसरात तलावाचीच स्थिती निर्माण होते. त्यामुळे घराबाहेर निघणेही कठीण होते. यासंदर्भात अनेकदा तक्रार करूनही कोणत्याही प्रकारची कार्यवाही करण्यात आली नसल्याबाबत तक्रार श्री.पंपाजीया यांनी केली. रामदासपेठ येथील सोमलवाल स्कूलच्या मागील बाजुच्या रोडची स्थिती खराब असल्याने हा रस्ता तयार करण्याबात अनेकदा मागणी करण्यात आली. शिवाय शाळेच्या मागील बाजुस असलेल्या हॉस्पीटलमुळे या मार्गावर नेहमीच वाहतुकीची समस्या असते, अशी तक्रार अरूण गुरमानी यांनी मांडली. रूचा परांजपे यांनी रामदासपेठमधील निवासी भागातील आतील रस्ते अरुंद, वाहन पार्कींगसाठी जागा नाही, रस्त्यावरील खोदकामाने खड्ड्याचा त्रास, कॅनल रोडवर खड्डे यासोबत उद्यानात लावण्यात आलेल्या झाडांमध्ये आवश्यक अंतर न राखल्याने झाडांच्या वाढीला अडचण याबाबत तक्रार मांडली. याशिवाय उद्यानामध्ये सुगंधीत फुलांच्या झाडांसह वड, तुळस, निंबाची झाडे लावण्याची मागणी त्यांनी केली.
जयंत परांजपे यांनी दवाखान्यातील बायोमेडीकल वेस्ट संकलीत करण्यासाठीच्या स्वतंत्र व्यवस्थेप्रमाणेच ई-कचरा संकलनासाठी वेगळी व्यवस्था करण्याची सूचना त्यांन मांडली. निकामी मोबाईल, बॅटरी, चार्जर अशी उपकरणे अत्यंत धोकादायक असून त्याचे वेगळे संकलन करून योग्य व्यवस्थापन करण्याची त्यांनी मागणी केली. हरजीत बग्गा यांनी मोकाट कुत्र्यांच्या समस्येमुळे मनपातर्फे न्यायालयाला विनंती करून याबाबत कठोर कायदा तयार करण्याची विनंती केली. रामदासपेठमधील पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाच्या मोकळ्या जमिनीवर पावसाळ्यात पाणी जमा होते. त्यामुळे परिसरात दुर्गंधी व डासांची समस्या निर्माण होते, यासंदर्भात कार्यवाहीची मागणी त्यांनी केली.
उद्यानाच्या बाहेर टाकला जाणारा कचरा दररोज कचरा पेटीमध्ये टाकून परिसर स्वच्छ ठेवण्यासाठी कार्य करणा-या बलदेव चावला यांचे यावेळी महापौरांनी विशेष अभिनंदन केले. आपल्या परिसरात असलेल्या कच-याच्या समस्येला आपण स्वत:च जबाबदार आहोत. त्यामुळे प्रत्येकाने जबाबदारीने स्वच्छता राखण्यासाठी पुढाकार घेतल्यास व मनपाला सहकार्य केल्यास शहर नक्कीच स्वच्छ व सुंदर होईल, असा विश्वास महापौरांनी व्यक्त केला. कॅनल रोड संदर्भातील तक्रारीवर बोलताना महापौरांनी कंत्राटदारांच्या बेजबाबदारपणामुळे रस्त्यांच्या कामाला विलंब होत असल्याचे सांगितले. याबाबत कंत्राटदरांची बैठक घेउन आवश्यक कार्यवाही करण्यात येईल, असेही ते म्हणाले.
शहर अस्वच्छ करणा-यांवर कारवाईसाठी मनपाचे उपद्रव शोध पथक तैनात आहे. पथकामध्ये नवीन पदभरती करून पथकाचे अधिक बळकट करण्यात आले आहे. कारवाईचा धाक असला तरी शहराच्या अस्वच्छतेसाठी लोकांची मानसिकता जबाबदार आहे. त्यामुळे आधी मानसिकता बदलविणे गरजेचे आहे, असे महापौर संदीप जोशी म्हणाले. कुत्र्यांच्या समस्येवर न्यायालयाच्या आदेशाचे पालन करूनच कारवाई केली जाणार आहे. मात्र केवळ मोकाट कुत्र्यांचाच नाही तर घरातील पाळीव कुत्र्यांमुळे होणा-या त्रासाच्या अनेक तक्रारी येत असल्याचे त्यांनी सांगितले. कुत्र्यांमुळे निर्माण होणारी दहशत, घाण याबाबत लवकरच आवश्यक ती कार्यवाही करण्यात येईल, असे त्यांनी सांगितले.
रामदासपेठ येथील गुरूद्वाराच्या मागील बाजुला असलेल्या डॉ.पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाच्या जागेवर मोठे पार्कींग तळ तयार करण्यात येणार आहे. येथे सेंट्रल बाजारा रोड व धंतोली येथील संपूर्ण पार्कींग केली जाईल. त्यामुळे परिसरातील पार्कींगची मुख्य समस्या सुटू शकेल. याशिवाय धंतोली व रामदासपेठ येथील दवाखाने व हॉस्पीटलच्या गर्दीमुळे परिसरात वाहतुकीची मोठी समस्या असते. यावर उपाय म्हणून धंतोली व रामदासपेठ येथे केवळ ओपीडी ठेवून हॉस्पीटलसाठी ‘ऑरेंज सिटी स्ट्रिट’ येथे माफक दरात जागा देण्याचे प्रस्तावित असल्याचेही यावेळी महापौर संदीप जोशी यांनी सांगितले.
आपले नागपूर शहर स्वच्छ, सुंदर यासोबत पर्यावरणपूरक करण्यासाठी कटिबद्ध आहोत. मात्र यासाठी प्रत्येकाने स्वत:ची जबाबदारी ओळखून कार्य करणे आवश्यक आहे. जनसहभागाशिवाय कोणत्याही शहराचा विकास होउ शकत नाही, असेही महापौर म्हणाले.