Published On : Thu, Feb 21st, 2019

99 वे नाट्य संमेलन आजपासून

प्रा. महेश एलकुंचवार यांच्या हस्ते उद्घाटन, मुख्यमंत्री फडणवीस प्रमुख पाहुणे, प्रेमानंद गज्वी संमेलनाध्यक्ष

नागपूर: अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेच्या 99व्या नाट्य संमेलनाला उद्यापासून (शुक्रवार) नागपुरात प्रारंभ होत आहे. रेशीमबाग मैदानावरील कै. पुरुषोत्तम दारव्हेकर रंगमंचावर सायंकाळी 6.30 वाजता ज्येष्ठ नाटककार प्रा. महेश एलकुंचवार यांच्या हस्ते संमेलनाचे उद्घाटन होईल.

यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थिती राहतील. तर नाट्य संमेलनाचे नियोजित अध्यक्ष प्रेमानंद गज्वी, विद्यमान अध्यक्ष कीर्ती शिलेदार,केंद्रीय रस्ते व भुपृष्ठ वाहतुक मंत्री तसेच संमेलनाचे स्वागताध्यक्ष नितीन गडकरी आणि महापौर नंदा जिचकार यांची व्यासपीठावर प्रमुख उपस्थिती असेल. उद्घाटन सोहळ्यापूर्वी दुपारी 3 वाजता महालमधील शिवाजी पुतळा येथून नाट्यदिंडी निघेल. चिटणीस पार्क स्टेडियम, बडकस चौकमार्गे ही दिंडी संमेलनस्थळी पोहोचेल. कलशधारी 99 महिला दिंडीचे नेतृत्व करणार आहेत. शिवशाही ढोलपथकासह नागपुरातील जुन्या दिग्गज कलावंतांच्या स्मृतींना उजाळा देणारा चित्ररथ सर्वांचे लक्ष वेधून घेणार आहे. उद्घाटन सोहळ्यानंतर रात्री 10 वाजता कवीवर्य सुरेश भट सभागृहात “पुन्हा सही रे सही” या गाजलेल्या व्यावसायिक नाटकाचा प्रयोग होईल. तर पहाटे एक वाजता झाडीपट्टी रंगभूमीवरील “आक्रोश” या नाटकाचा प्रयोग होणार आहे.

अशी निघणार दिंडी
शिवाजी पुतळा महाल – चिटणीस पार्क स्टेडियम – बडकस चौक – कोतवाली पोलिस स्टेशन – कल्याणेश्वर मंदिर – झेंडा चौक – जुनी शुक्रवारी पूल – कवीवर्य सुरेश भट सभागृह – रेशीमबाग मैदान मुख्य रंगमंच

महेश मांजरेकर यांची उपस्थिती
नाट्य संमेलनाच्या दिंडीमध्ये नाट्य व चित्रपट क्षेत्रातील सेलिब्रिटीजची उपस्थिती साऱ्यांचे लक्ष वेधणार आहे. सुप्रसिद्ध अभिनेते-दिग्दर्शक महेश मांजरेकर, ज्येष्ठ अभिनेते डॉ. गिरीश ओक व शरद पोंक्षे, डॉ. विलास उजवणे, अभिनेत्री मधुरा वेलणकर व सुकन्या मोने, ज्येष्ठ अभिनेते मोहन जोशी व विजय गोखले, सुप्रसिद्ध अभिनेता भरत जाधव, विनय येडेकर, विजय चौगुले आदी मंडळी नाट्य दिंडीला उपस्थि राहणार आहेत.