| | Contact: 8407908145 |
  Published On : Tue, Apr 11th, 2017

  4 महिन्यात 97 बळी, स्वाईन फ्लूची राज्यभरात दहशत


  मुंबई:
  आटोक्यात आलेल्या स्वाईन फ्लूच्या राक्षसाने पुन्हा एकदा डोके वर काढले आहे. गेल्या 4 महिन्यात स्वाईन फ्लूमुळे तब्बल 97 लोकांचा मृत्यू झाल्याची धक्कादायक माहिती पूढे आली आहे. केवळ एकट्या पूण्यात स्वाईन फ्लूमुळे मृत्यू झालेल्यांचा आकडा 31वर असून, 23 जण व्हेंटीलेटरवर आहेत. हा आकडा वाढतच असल्यामुळे राज्यातील आरोग्य विभागही सतर्क झाला आहे.

  प्राप्त माहितीनुसार पुण्यात स्वाईन फ्लुच्या रूग्णांमध्ये वाढ होत आहे. जिल्हा शासकीय रुग्णालयात 6 जणांवर तर, खासगी रूग्णालयात 28 जणांवर उपचार सुरू आहेत. एकूणच काय तर, पुण्यात सध्या नोद असलेले स्वाईन फ्लूचे 34 रूग्ण आहेत. पुण्यापाठोपाठ नाशिकमध्येही स्वाईन फ्लूने थैमान घातले आहे. एप्रिल महिन्याच्या पहिल्या आठवड्यात इथे स्वाईन फ्लूमुळे 6 जणांना आपले प्राण गमवावे लागले. तर, मागच्या तीन महिन्यात नाशिकमध्ये 23 जणांचा मृत्यू स्वाईनफ्लूमुळे झाल्याची माहिती आहे. 23 मृतांपैकी 18 जण खासगी रूग्णालयात मृत्यू पावले तर, 5 शासकीय रूग्णालयात.

  सुरक्षेचा उपाय म्हणून कोणत्याही प्रकारचे दुखने विशेषत: सर्दी, ताप, थंडी, डोकेदुखी, खोकला यांकडे दुर्लक्ष करू नये. तसेच, कोणतेही दुखणे अंगावर काढू नये. असं करणं आरोग्याच्या दृष्टीने धोक्याचे असल्याचे आरोग्य विभागाने म्हटले आहे. थंडी वाजून येणं, 100 पेक्षा जास्त ताप येणं, घसा दुखणं किंवा खवखवणं, अंगदुखी किंवा पोटदुखी ही सगळी स्वाईन फ्लूची लक्षणं आहेत. यावर वेळीच उपचार घेतल्यास त्यावर नियंत्रण मिळवता येते. त्यासाठी लस किंवा टॅमी फ्लूच्या गोळ्या डॉक्टरांच्या सल्ल्याने घ्याव्यात, असेही आरोग्य विभागाने म्हटले आहे.

  दरम्यान, स्वाईन फ्लूमुळे घाबरून जाण्याचे काहीच कारण नाही. हा आजार कोणालाही होऊ शकतो. तसेच, योग्य उपचार घेतल्यास त्यावर इलाजही करता येतो. फक्त निष्काळजीपणाने कोणतेही दुखने अंगावर काढू नये. त्रास जाणवू लागल्यास वेळीच डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.

  Trending In Nagpur
  Stay Updated : Download Our App
  Mo. 8407908145