Published On : Tue, May 29th, 2018

बार कौन्सिल निवडणुकीत वकिलांची तब्बल ८५८ मते ‘डाऊटफुल’

नागपूर : बार कौन्सिल ऑफ महाराष्ट्र आणि गोव्याच्या निवडणुकीत पुन्हा वाद सुरु झाला आहे. या निवडणुकीसाठी करण्यात आलेल्या मतदानात त्रुटीपूर्ण झाले आहे. आतापर्यंत बार कौन्सिलने २१ जिल्ह्यांतील प्रथम पसंतीक्रम मतमोजणीची आकडेवारी जाहीर केली. त्यावेळी ही बाब स्पष्ट झाली आहे. २१ जिल्ह्यांमध्ये तब्बल ८५८ मते त्रुटीपूर्ण आढळून आली आहेत.

गेल्या २८ मार्च रोजी कौन्सिलच्या २५ जागांसाठी निवडणूक पार पडली. निवडणुकीत एकूण १ लाख १२ हजार ९८६ पैकी ६६ हजार ६५० नोंदणीकृत वकिलांनी मतदान केले.यावेळी कौन्सिलतर्फे निवडणुकीत मतदान कसे करावे यासंदर्भात आवश्यक सूचना देण्यात आल्या होत्या. त्यानंतरही शेकडो वकील नियमानुसार मतदान करण्यात अपयशी ठरले. या निवडणुकीत एकूण १६४ उमेदवार उभे होते. मतपत्रिकेवर उमेदवारांच्या नावापुढे प्रथम, द्वितीय, तृतीय अशा पद्धतीने पसंतीक्रम नोंदवायचा होता. परंतु, अनेक वकिलांना ते जमले नाही.

Bar Council List

मिळालेल्या माहितीनुसार, कुणी उमेदवारांच्या नावापुढे स्वाक्षऱ्या केल्या तर कुणी एकापेक्षा जास्त उमेदवारांना समान पसंतीक्रमाचे मत दिले तर, कुणी उमेदवाराचे अनुक्रमांक त्यांच्या नावापुढे लिहिले. तसेच,बऱ्याच मतपत्रिका कोऱ्या व पसंतीक्रम खोडतोड केलेल्या आढळून आल्यात. कौन्सिलने अशी सर्व मते त्रुटीपूर्ण वर्गात टाकली आहेत. गुजरात उच्च न्यायालयाचे सेवानिवृत्त न्यायमूर्ती आर. डी. व्यास यांची एक सदस्यीय विशेष समिती या मतांचे भविष्य ठरविणार आहे. या निवडणुकीसंदर्भातील तक्रारींवर निर्णय घेण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार ही समिती स्थापन करण्यात आली आहे.