Published On : Tue, Mar 2nd, 2021

टेलिफोन एक्स्चेंज मेट्रो स्थानकाचे ८०% कार्य पूर्ण

– रिच-४ चे कार्य जलदगतीने प्रगतीपथावर

नागपूर : नागपूर मेट्रोच्या रिच-१ वर्धा रोड आणि रिच-३ हिंगणा रोड या दोन्ही मार्गिका प्रवासी सेवेसाठी सुरु झाल्यानंतर, उर्वरित दोन मार्गिकेवरील प्रवासी सेवा सुरु होण्यासाठी नागपूरकर वाट पाहत आहेत. या दोन्ही मार्गिकेवरील कार्य जलदगतीने सुरु असून आता येथील स्थापत्य दृष्टिक्षेपास येऊ लागले आहे. डबल डेकर, मेट्रो पूल आकाराला आले असून स्थानकाच्या इमारती साकार झाल्याचे दिसू लागले आहे त्यामुळे या मार्गांवरील परिसराचे दृश्यच बदललेले जाणवते आहे. रिच-४ म्हणजेच सेंट्रल एव्हेन्यू या मार्गिकेवर स्थानकाच्या इमारती मेट्रो वायाडक्टला जोडून उभ्या राहिल्या आहेत. याच मार्गिकेवरील टेलिफोन एक्स्चेंज मेट्रो स्थानकाची इमारत आत्ता पूर्ण आकाराला आली असून ह्याचे कार्य आता वेगाने पूर्णत्वास येत आहे.

सेंट्रल एव्हेन्यू रोडच्या मध्यभागी असलेल्या टेलिफोन एक्स्चेंज मेट्रो स्टेशनमध्ये त्याच्या ऐन मोक्याच्या स्थळामुळे रायडरशिप वाढवण्याची प्रचंड क्षमता आहे. आजूबाजूची व्यापारी संकुले, निवासस्थाने, बँका आणि इतर व्यावसायिक दुकानांसारख्या कार्यालयीन परिसरामुळे या क्षेत्रासाठी मेट्रोचा प्रवास अत्यंत सोयीस्कर ठरणार आहे. या परिसरातून प्रवासी दोन्ही दिशेने दुरून प्रवास करतात. हे मेट्रो स्थानक पूर्ण झाल्यावर आणि प्रवासी सेवेत दाखल केल्यानंतर हे स्टेशन ट्रान्झिट ओरिएंटेड डेव्हलपमेंटचे एक उत्तम उदाहरण ठरेल.

टेलिफोन एक्स्चेंज मेट्रो स्थानकाची लांबी ८३.२५० मीटर आणि रुंदी २१.५०० मीटर एवढी आहे. संपूर्ण कामांपैकी या स्थानकाचे ८०% कार्य आतापर्यंत पूर्ण झाले असून उर्वरित कार्य जलदगतीने प्रगतीपथावर आहे. स्थानकाच्या जमिनी स्तरावरील – बॉक्स पेंटिंग बॅलन्स, एरिया डेव्हलपमेंट बॅलन्स, युटिलिटीज बॅलन्स सारखी कामे पूर्ण झाली आहेत. कॉन्कोर्स स्तरावर – फ्लोअरिंग लिफ्ट शाफ्ट, एससीआर, टॉम, एस्केलेटर, हे सर्व पूर्ण झाले असून इतर कामे प्रगतीपथावर आहे. प्लॅटफॉर्म स्तरावर – फ्लोअरिंग आणि पीईबी, छताची रचना पूर्ण झाली आणि दोन्ही रूफ शीटिंग बॅलन्सचे कार्य अंतिम टप्प्यावर आहे. दक्षिण बाजूचे ई/ई ब्लॉक काम, प्लास्टरचे काम प्रगतीपथावर आहे.

या मार्गिकेवरील वायाडक्टचे म्हणजे मेट्रो पुलाचे कार्य जवळ जवळ पूर्ण झाले असून रूळ बसविण्याचे कार्य अंतिम टप्प्यात सुरु आहे.