
नागपूर : यशोधरा नगर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील संघर्ष नगर परिसरात असलेल्या राज गवई पब्लिक स्कूलमध्ये इयत्ता सातवीत शिकणाऱ्या विद्यार्थिनीला मारहाण केल्याप्रकरणी शाळेच्या मुख्याध्यापिका आणि एका शिक्षिकेविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेमुळे शिक्षण क्षेत्रात खळबळ उडाली आहे.
जिल्हा बाल संरक्षण कक्षाअंतर्गत चालणाऱ्या चाइल्ड हेल्पलाईन उपक्रमाशी संबंधित समुपदेशक मंगला तेंभूर्णे यांनी या प्रकरणी तक्रार दाखल केली आहे. तक्रारीनुसार, २२ जानेवारी रोजी सदर विद्यार्थिनीने तिच्या मैत्रिणीकडे आरसा मागितला होता. याच कारणावरून ‘तस्लीम’ नावाच्या शिक्षिकेने विद्यार्थिनीला बेदम मारहाण केल्याचा आरोप आहे. त्यानंतर दोन्ही विद्यार्थिनींना शिक्षा म्हणून वर्गाबाहेर उभे करण्यात आले.
यानंतर शाळेच्या मुख्याध्यापिका नसीन अख्तर यांनी विद्यार्थिनीला केबिनमध्ये बोलावून घेत लोखंडी पट्टीने मारहाण केल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले आहे. ‘शाळेच्या नियमांचे पालन करत नाहीस,’ असे म्हणत मुख्याध्यापिकेने मारहाण केल्याचा आरोपही करण्यात आला आहे.
घरी परतल्यानंतर विद्यार्थिनीने घडलेला प्रकार पालकांना सांगितला. संतप्त पालकांनी शाळेत जाऊन संबंधित कर्मचाऱ्यांवर कारवाईची मागणी केली. मात्र शाळा प्रशासनाकडून कोणतीही दखल न घेतल्याने पालकांनी अखेर जिल्हा बाल संरक्षण कक्षाकडे धाव घेतली.
तक्रारीच्या आधारे यशोधरा नगर पोलिसांनी मुख्याध्यापिका आणि शिक्षिकेविरोधात गुन्हा दाखल केला असून पुढील तपास सुरू आहे.








