| | Contact: 8407908145 |
  Published On : Tue, Jun 5th, 2018

  खरीप हंगामासाठी ७ लाख क्विंटल बियाणांचा पुरवठा

  पुणे :राज्यात मान्सूनचे आगमन होताच बळीराजा आता खरीप हंगामासाठी सज्ज झाला असून, प्रशासनानेही आपली तयारी पूर्ण केली आहे. खरीप हंगामासाठी राज्यात विविध पिकांच्या १६ लाख ६३ हजार ७५० क्विंटल बियाणांचे नियोजन केले असून त्यापैकी ७ लाख ११ हजार ५७२ क्विंटल बियाणांचा पुरवठा करण्यात आला आहे. तसेच ४३ लाख टन खत पुरवठ्याचे नियोजन आहे. त्यापैकी १३ लाख टन खताचा पुरवठा मे महिना अखेरपर्यंत झाला आहे.

  यावर्षी राज्यात खरीप हंगामात सुमारे १५२ लाख हेक्टर क्षेत्रावर पेरण्यांचे नियोजन करण्यात आले आहे. त्यात कापूस आणि सोयाबीनचे प्रत्येकी ३६ लाख हेक्टर, भात आणि तूर प्रत्येकी १६ लाख हेक्टर, मका ९ लाख ३० हजार हेक्टर आणि तेलबियांचे ३९ लाख ६९ हजार हेक्टरवर पेरण्या होतील. गेल्यावर्षी ३६ लाख ५८ हजार टन खतांचा पुरवठा करण्यात आला होता. त्यामध्ये वाढ करण्यात आली असून, केंद्र सरकारने सुमारे ४० लाख टन खतांचा पुरवठा मंजूर केला आहे. या खरीप हंगामात ४३ लाख टन खतांची मागणी गृहीत धरुन नियोजन करण्यात आले आहे. केंद्र सरकारने मंजुर केलेल्या ४० लाख टन खतामध्ये १५ लाख टन युरिया, साडेचार लाख डीएपी, ३ लाख एमओपी, संयुक्त खते ११, एसएसपी ६ लाख आणि इतर खतांचे प्रमाण ५० हजार टन इतके आहे.

  यंदा तृणधान्य, कडधान्य आणि इतर बियाणांची १६ लाख २५ हजार ७८९ क्विंटल बियाणांची गरज भासेल. त्यापैकी १६ लाख ६३ हजार ७५० क्विंटल बियाणांची उपलब्धता करण्यात आली असून, ७ लाख ११ हजार ५७२ क्विंटल बियाणांचा पुरवठा करण्यात आला आहे. त्यात संकरीत ज्वारी ८ हजार ४४९, देशी ज्वारी ५०, संकरीत बाजरी ४ हजार २०९, भात ८६ हजार ७८९, मका ४ हजार ७९४, तूर ९ हजार ६०४, मूग ३ हजार ३३२, उडीद १३ हजार २१८, सोयाबीन ५ लाख ७२ हजार ५०, बीटी कापूस ९ हजार ६८ क्विंटल बियाणांचा पुरवठा २ जून पर्यंत करण्यात आला आहे.

  Stay Updated : Download Our App
  Mo. 8407908145