
नागपूर : तहसील पोलीस ठाण्याच्या हद्दीत धक्कादायक प्रकार समोर आला आहे. ६६ वर्षीय आईवर चाकूने हल्ला करण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी सचिन टाकळीकर याला तहसील पोलिसांनी अटक केली आहे. आरोपीविरुद्ध यापूर्वीच सात गुन्हे दाखल असून, त्याने तब्बल १६ वर्षांची शिक्षा भोगली आहे. गेल्याच वर्षी तो हत्या प्रकरणातील शिक्षेनंतर कारागृहातून बाहेर आल्याची माहिती पोलिसांनी दिली.
ही घटना कुंभारपुरा, जगन्नाथ बुधवारी येथील शिवभोजन थाळी केंद्रात घडली. ६६ वर्षीय लीलाबाई टाकळीकर या केंद्रात असताना त्यांचा ४२ वर्षीय मुलगा सचिन तेथे आला. दारू पिण्यासाठी आईकडे पैसे मागणे आणि लग्न झाले नसल्याच्या कारणावरून तो आईसोबत वाद घालत असल्याचा आरोप आहे.
घटनेच्या वेळी आरोपीने आईसोबत शिवीगाळ करत जीवे मारण्याची धमकी दिली. वाद वाढल्यानंतर त्याने चाकू काढून आईवर हल्ला करण्याचा प्रयत्न केला. याचवेळी शिवभोजन केंद्रात काम करणाऱ्या ललिता निमजे यांनी धाडसाने मध्यस्थी करत आरोपीच्या हातातील चाकू हिसकावून घेतला. त्यांच्या तत्परतेमुळे मोठा अनर्थ टळला.
घटनेची माहिती मिळताच तहसील पोलिसांनी सचिन टाकळीकरला अटक केली असून, त्याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास तहसील पोलीस करीत आहेत.




