
नागपूर – नंदनवन परिसरात मध्यरात्री झालेल्या हिंसाचार प्रकरणात नंदनवन पोलिसांनी सात जणांना अटक केली आहे. सोमवारी रात्री राष्ट्रसंत तुकडोजी महाराज सभागृहाच्या इमारतीतील एफएस झोन कॅफे बाहेर दोन गटांत झालेल्या वादाचे रूपांतर हिंसाचारात झाले. यावेळी कॅफेला तसेच एका कारला आग लावण्यात आली होती.
या प्रकरणात मंगळवारी रात्री आणखी चार आरोपींना अटक करण्यात आली असून, त्यात शिवम ठाकूर, यश तोडसे, आकाश येवले आणि पंकज तोडसे यांचा समावेश आहे. यापूर्वी पोलिसांनी राहुल भुरे, ऋषिकेश वाघमारे आणि अभिजीत शेलके यांना अटक केली होती. त्यामुळे एकूण अटक झालेल्या आरोपींची संख्या सात झाली आहे.
पोलिसांनी परिसरातील सीसीटीव्ही फुटेज, तांत्रिक पुरावे तसेच स्थानिक साक्षीदारांच्या मदतीने तपास करत सर्व आरोपींची ओळख पटवली.
“सीसीटीव्ही चित्रफितींचे बारकाईने विश्लेषण करून आणि साक्षीदारांची चौकशी करून या घटनेत सहभागी सर्व आरोपींचा शोध घेण्यात यश आले,” अशी माहिती नंदनवन पोलीस ठाण्याच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने दिली.
घटनेनंतर परिसरात काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. सध्या परिस्थिती नियंत्रणात असून, पुढील तपास नंदनवन पोलीस करत आहेत.








