नागपूर : उपराजधानी नागपूर जिल्ह्यात कायदा-सुव्यवस्था अधिक मजबूत करण्यासाठी सहा नवीन पोलीस ठाण्यांना मंजुरी देण्यात आली आहे. यामध्ये तीन ठाणे शहरात तर तीन ठाणे ग्रामीण भागात सुरू करण्यात येणार आहेत. स्वातंत्र्य दिनाच्या निमित्ताने पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी ही माहिती दिली.
बावनकुळे म्हणाले, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या आभार मानतो. नागपूर शहरात एक नवीन पोलीस झोन कार्यान्वित होणार असून, अधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात येणार आहे. वाहतूक व्यवस्थाही अधिक सक्षम केली जात आहे. शहरात कलमणा, भीलगाव आणि कनोरीबारा येथे नवे पोलीस ठाणे उभारण्यात येणार आहेत.
ग्रामीण भागातही तीन पोलीस ठाण्यांना मंजुरी मिळाली असून, कामठी तालुक्यातील बडोदा, कळमेश्वर तालुक्यातील मोहपा आणि कुही तालुक्यातील पाचगाव येथे नवे पोलीस ठाणे स्थापन केले जाणार आहेत.
बावनकुळे यांनी सांगितले की, नागपूर जिल्ह्यातील वाढती लोकसंख्या, शहरी विस्तार आणि गुन्हेगारीवर नियंत्रण या गरजा लक्षात घेऊन हा निर्णय घेण्यात आला आहे. ग्रामीण भागातील ठाण्यांमुळे नागरिकांना जलद आणि प्रभावी पोलीस सेवा मिळणार आहे, तर शहरी भागातील ठाण्यांमुळे वाहतूक नियंत्रण, सायबर गुन्हे आणि शहरी गुन्ह्यांवर अधिक काटेकोर लक्ष ठेवता येईल.
ते पुढे म्हणाले की, नागपूरला सुरक्षित आणि प्रगत शहर बनवण्यासाठी सरकार सातत्याने पावले उचलत आहे. सीसीटीव्ही नेटवर्कचा विस्तार, आर्टिफिशियल इंटेलिजन्सवर आधारित नजर ठेवण्याची यंत्रणा आणि आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून पोलीस दल अधिक सक्षम करण्यात येणार आहे. नवीन पोलीस ठाण्यांमुळे पोलिसांची उपस्थिती वाढेल, गुन्हेगारांमध्ये धाक बसेल आणि नागरिकांचा सुरक्षेवरील विश्वास अधिक दृढ होईल.