Published On : Fri, May 20th, 2022
By Nagpur Today Nagpur News

सापळा कारवाईनंतर गुन्हा दाखल करण्यास ६ तास विलंब – आरोपीला खोट्या गुन्ह्यांत अडकविल्याची शक्यताः जिल्हा न्यायालय

Advertisement

– चरस तस्कराची निर्दोष सुटका

नागपूर: सव्वा किलो चरस तस्करी करताना रंगेहात पकडल्यानंतर अंमली पदार्थ विरोधी पथकाने सहा तास विलंबाने गुन्हा दाखल केला. पोलिसांकडून विलंबाचे कारण स्पष्ट करण्यात आले नाही व कारवाईदरम्यान सरकारी पंचही बोलवले नाही. ही परिस्थिती अनाकलनीय असल्याने पोलिसांनी आरोपीला खोट्या गुन्ह्यांत अडकवण्याची शक्यता नाकारता येत नाही, असे मत व्यक्त करून अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायाधीश पी.बी. घुगे यांनी सबळ पुराव्यांअभावी तस्कराची निर्दोष सुटका केली.

Gold Rate
07 May 2025
Gold 24 KT 97,500/-
Gold 22 KT 90,700/-
Silver/Kg 96,700/-
Platinum 44,000/-
Recommended rate for Nagpur sarafa Making charges minimum 13% and above

निलेश रमेश आसरे (वयः ४२, रा. नरसाळा रोड) असे निर्दोष सुटका करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. ११ जुलै २०१७ ला गुन्हे शाखेच्या अंमली पदार्थ विरोधी पथकाने सापळा रचून हुडकेश्वर मार्गावर संध्याकाळी ५.३० वाजता आरोपीला त्याच्या एमएच-४०, एसी-०५५७ क्रमांकाचेया कारमधून चरस तस्करी करताना ताब्यात घेतले. त्यानंतर त्याची अंगझडती घेतली असता एका पिशवीतून पोलिसांना १ लाख २४ हजार रूपये किंमतीची १ किलो २४२ ग्रॅम चरस सापडली. या प्रकरणी पोलिसांनी हुडकेश्वर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करून आरोपीला अटक केली. तेव्हापासून आरोपी कारागृहात होता. या प्रकरणी सत्र न्यायाधीश घुगे यांच्यासमक्ष खटला चालवण्यात आला. सर्व साक्षीदार व पुरावे तपासून व दोन्ही पक्षांच्या वकिलांचा युक्तिवाद ऐकल्यानंतर न्यायालयाने पोलिसांच्या कारवाईवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले.

पोलिसांना ११ जुलै २०१७ ला दुपारी ३.१० वाजता गोपनीय माहिती मिळाली. यानंतर पोलिसांनी गजानन महाराज मंदिराजवळ सापळा रचून ५.३० वाजता आरोपीला रंगेहात पकडले. यानंतर ताबडतोब गुन्हा दाखल अपेक्षित असताना घटनास्थळ हुडकेश्वर पोलीस ठाण्यापासून जवळच असताना तब्बल सहा तास विलंबाने म्हणजे मध्यरात्री १२.२९ वाजता गुन्हा दाखल केला. घटनास्थळापासून पोलीस ठाण्यात पोहोचून गुन्हा दाखल करण्यासाठी एनडीपीएस पथकाला इतका विलंबा का लागला, हे पोलिसांना स्पष्ट करता आले नाही. दुसरीकडे आरोपीची अंगझडती घेताना पोलिनांनी कायद्यातील मार्गदर्शक तत्वांचे पालन केलेले दिसत नाही. तसेच पोलिसांचे जबाब व स्वतंत्र साक्षीदारांच्या जबाबात प्रचंड विषमता आहे. यावरून पोलिसांनी आरोपीला खोट्या गु्न्ह्यात अडकवण्याची शक्यता नाकारता येत नसून सबळ पुराव्या अभावी आरोपीची निर्दोष सुटका करण्यात येत असल्याचा निर्वाळा न्यायालयाने दिला.

आरोपीच्या वतीने ॲड. आर. तिवारी यांनी काम पाहिले. ॲड. सौरभ त्रिवेदी, ॲड. रिषभ शुक्ला, ॲड. मंगेश राऊत, ॲड. अर्पण लद्दड यांनी त्यांना सहकार्य केले.

Advertisement
Advertisement