Published On : Sun, Jun 3rd, 2018

रत्नागिरीनजिक समुद्रात सहा जण बुडाले, महिला बचावली

रत्नागिरी : समुद्रात पोहण्यासाठी गेलेल्या सहा जणांपैकी एक महिला बचावली असून, पाच जणांचे मृतदेह सायंकाळी उशिरा सापडले तर बेपत्ता असलेली महिला जीवंत आहे. रत्नागिरी-गणपतीपुळे मार्गावर असलेल्या आरे वारे येथील समुद्रात पोहण्यासाठी गेले होते. हे सर्वजण बोरिवली (मुंबई) येथील राहणारे आहेत. घटना रविवारी सायंकाळी घडली. मृतांमध्ये एकाच कुटुंबातील दोन महिला आणि तीन पुरुषांचा समावेश आहे.

रेंचर डिसुजा (१९), मॅथ्यू डिसुजा (१८), केनेथ डिसुजा (५४), मोनिका डिसुजा (४४), सनोमी डिसुजा (२२, सर्व मेधा कॉलनी, हॉलीक्रॉस रोड, शुभजीवन सर्कल, बोरिवली पश्चिम) अशी मृतांची नावे आहेत. रिटा डिसुजा (७०) यांना वाचवण्यात यश आले आहे. जिल्ह्यातील पर्यटन हंगाम अंतिम टप्प्यात आला असताना घडलेल्या या दुर्घटनेने हंगामाला गालबोट लागले आहे.

बोरिवली येथील डिसुजा कुटुंबिय सायंकाळच्या सुमारास आरेवारे येथील समुद्रात स्नानासाठी उतरले होते. मात्र त्यांना पाण्याचा अंदाज न आल्याने आणि पाण्याचा वेगही जास्त असल्याने लाटांबरोबर ते समुद्रात ओढले जाऊ लागले. त्यापैकी एक महिला लाटांचा तडाखा बसल्याने समुद्रातून बाहेर आली, त्यामुळे बचावली तर अन्य पाचजण समुद्रात गटांगळ्या खावू लागले.