Oops! It appears that you have disabled your Javascript. In order for you to see this page as it is meant to appear, we ask that you please re-enable your Javascript!
  | | Contact: 8407908145 |
  Published On : Mon, Jun 25th, 2018

  ५३८ किलो प्लास्टिक जप्त, दीड लाखांवर दंडवसुली

  नागपूर :नागपूर महानगरपालिकेने प्लास्टिकविरोधात शनिवारपासून (ता. २३) धडक मोहीम उघडली असून पहिल्याच दिवशी दहाही झोनमध्ये करण्यात आलेल्या कारवाईतून ५३८.९ किलो प्लास्टिक जप्त करण्यात आले. एकूण दीड लाख रुपयांच्या वर दंड वसूल करण्यात आला.या मोहिमेमुळे आता प्लास्टिक विक्रेत्यांचे आणि वापरणाऱ्यांचेही धाबे दणाणले आहे.

  महाराष्ट्र शासनाने प्लास्टिकबंदीची अधिसूचना काढल्यानंतर त्याची अंमलबजावणी करण्याकरिता मुदत शुक्रवारी (ता. २२) संपली.त्यामुळे शनिवार पासून कारवाईची धडक मोहीम सुरु करण्यात आली. त्याच्या नियोजनासाठी शुक्रवारीच अतिरिक्त आयुक्त रवींद्र कुंभारे यांनी आढावा बैठक घेतली होती. सदर बैठकीत कारवाई संदर्भात निर्देश देण्यात आले होते. त्यानुसार आज प्रत्येक झोनमध्ये प्रत्येकी दहा सदस्यीय चमूने कारवाईला सुरुवात केली.

  आजपासून कारवाई सुरू होणार म्हणून बहुतांश प्लास्टिक विक्रेत्यांनी दुकाने उघडली नाहीत, अशी माहिती आरोग्य अधिकारी (स्वच्छता) डॉ. प्रदीप दासरवार यांनी दिली. प्रत्येक झोनमधील पथकाने शासन आणि प्रशासनाच्या दिशानिर्देशानुसार अधिसूचनेत नमूद केल्याप्रमाणे ज्या प्लास्टिक पिशव्या आणि प्लास्टिक वस्तूंवर बंदी आहे अशा प्लास्टिक विकणाऱ्या आणि वापरणाऱ्या व्यक्तींवर कारवाई केली..

  ३४ जणांना नोटीस, एक एफआयआर

  या कारवाईअंतर्गत आज पहिल्या दिवशी दहाही झोन मिळून एकूण ३४ जणांना नोटीस देण्यात आली. लक्ष्मीनगर झोनअंतर्गत एका कारवाईदरम्यान दुकानदाराने पथकाशी हुज्जत घातली. त्यामुळे त्याच्या विरुद्ध पोलिसांत एफआयआर दाखल करण्यात आला. सर्वाधिक १५० किलो प्लास्टिकची जप्ती धरमपेठ झोन क्र. २ मध्ये करण्यात आली तर सर्वाधिक ३२ हजारांचा दंड मंगळवारी झोन क्र. १० मधून वसूल करण्यात आला.लक्ष्मीनगर झोन क्र. एक मध्ये एक नोटीस देण्यात आला नाही किंवा दंड वसुली झाली नाही. धरमपेठ झोन क्र. २ मध्ये १५० किलो प्लास्टिक जप्ती, सहा नोटीस आणि १० हजार दंड वसुली, हनुमाननगर झोन क्र. ३ मध्ये ३२ किलो प्लास्टिक जप्ती, पाच नोटीस आणि २३ हजार ५०० रुपयांची दंड वसुली, धंतोली झोन क्र. ४ मध्ये ५० किलो प्लास्टिक जप्ती, पाच नोटीस आणि २५ हजारांची दंडवसुली, नेहरूनगर झोन क्र. ५ मध्ये ४३ किलो प्लास्टिक जप्ती आणि २५ हजारांची दंड वसुली करण्यात आली.

  या झोन मध्ये एकही नोटीस देण्यातआली नाही.गांधीबाग झोन क्र. ६ मध्ये १३६ किलो प्लास्टिक जप्ती, पाच नोटीस आणि दहा हजारांची दंड वसुली, सतरंजीपुरा झोन क्र. ७ मध्ये ६.२०० किलो प्लास्टिक जप्ती, एक नोटीस आणि पाच हजार रुपयांची दंड वसुली, लकडगंज झोन क्र. ८ मध्ये २१.७०० किलो प्लास्टिक जप्ती, दोन नोटीस आणि १० हजार रुपयांचा दंड, आसीनगर झोन क्र. ९ मध्ये १८ किलो प्लास्टिक जप्ती, तीन नोटीस आणि १५ हजारांचा दंड तर मंगळवारी झोन क्र. १० मध्ये ८२ किलो प्लास्टिक जप्त करण्यात आला. सात नोटीस बजावण्यात आल्या आणि ३२ हजार रुपयांचा दंड वसूल करण्यात आला. दहाही झोन मिळून एकूण ५३८.९०० किलो प्लास्टिक जप्त करण्यात आले. ३४ नोटीस बजावण्यात आल्या आणि एकूण एक लाख ५५ हजार ५०० रुपयांचा दंड वसूल करण्यात आला, अशी माहिती आरोग्य अधिकारी (स्वच्छता) डॉ. प्रदीप दासरवार यांनी दिली.

  कारवाई कुठे आणि कुणावर होणार?

  प्लास्टिकबंदी अंतर्गत सर्व दुकाने व आस्थापना, सार्वजनिक ठिकाणे, बसस्थानके, रेल्वेस्थानके, वने व संरक्षितवने, इकोसेन्सेटिव्ह क्षेत्र आदी ठिकाणी कारवाई होईल. दुकानदार, मॉल्स, कॅटरर्स, घाऊक व किरकोळ विक्रेता, वितरक, वाहतूकदार, मंडई, स्टॉल्स आदी ठिकाणीही कारवाई होईल.

  प्लास्टिक बंदीसाठी पुढाकार घ्या :आयुक्तांचे आवाहन

  नागपूर शहरात आज, शनिवारपासून प्लास्टिकबंदीची अंमलबजावणी सुरू करण्यात आली आहे.प्लास्टिक बाळगल्यास पाच पासून २५ हजारांपर्यंत दंडात्मक कारवाई करण्यात येत आहे. या पार्श्वभूमीवर बंदी असलेल्या प्लास्टिकचा वापर बंद करा.याकरिता नागरिकांनी स्वत: पुढाकार घ्यावा, असे आवाहन मनपा आयुक्त वीरेंद्र सिंह यांनी केले आहे.

  बंदी असलेल्या वस्तू

  प्लास्टिक पासून बनविलेल्या पिशव्या, प्लास्टिक व थर्माकोलपासून बनविण्यात आलेले व एकदाच वापरल्या जाणारे ताट, ग्लास, वाट्या, चमचे, कप, स्ट्रॉ, हॉटेलमध्ये अन्नपदार्थ पॅकेजिंगसाठी वापरली जाणारी प्लास्टिकची भांडी, वाट्या, पॉलिप्रॉपीलेन बॅग, द्रवपदार्थ साठवण्यासाठी वापरण्यात येणारे प्लास्टिक पाऊच, कप आदीवर बंदी आहे. प्लास्टिक व थर्माकोलचा वापर सजावटीमध्ये करण्यास मनाई आहे.

  यावर बंदी नाही

  अर्धा लिटरच्या पाण्याच्या बाटल्स, औषधांचे वेष्टण, कृषी क्षेत्रातील सामान साठविण्यासाठीचे प्लास्टिक, नर्सरीमध्ये वापरात असलेले प्लास्टिक, अन्नधान्यासाठी ५० मायक्रॉनवरील पिशव्या, ५० मायक्रॉनवरील दुधाच्या पिशव्या, रेनकोट, कच्चा माल साठविण्यासाठी वापरात असलेले प्लास्टिक, टीव्ही, फ्रीजसारख्या उत्पादनांसाठी वापरले जाणारे थर्माकोल, बिस्कीट, चिप्स, वेफर, पुड्यांची वेष्टणे आदींवर बंदी नाही.

  काय करावे?

  कापडी, ज्यूट पिशव्यांचा वापर करावा.घरातून बाहेर पडताना कापडी पिशवी घेऊन निघावे.पाण्याची स्टील किंवा काचेची बाटली सोबत ठेवावी.दूध, दही, मासे, मटण आणण्यासाठी स्टीलच्या भांड्याचा वापर करावा.


  Stay Updated : Download Our App
  Mo. 8407908145