
नागपूर : शहराच्या सार्वजनिक वाहतुकीत मोठा बदल घडवणाऱ्या ५० नव्या विद्युत बसांचा शुभारंभ १४ फेब्रुवारी रोजी होणार आहे. केंद्र शासनाच्या प्रधानमंत्री विद्युत बस उपक्रमांतर्गत या बस नागपूर महानगरपालिकेच्या ‘आपली बस’ ताफ्यात समाविष्ट केल्या जात आहेत. कोराडी आगार येथे आयोजित कार्यक्रमात पंतप्रधान Narendra Modi आभासी माध्यमातून या बसांचे लोकार्पण करणार आहेत.
मान्यवरांची उपस्थिती-
या कार्यक्रमाला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस,
केंद्रीय मंत्री नितीन गडकरी व मनोहर लाल कट्टर , उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि सुनेत्रा पवार उपस्थित राहणार आहेत.
याशिवाय पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे , राज्यमंत्री आशिष जयस्वाल व माधुरी मिसळ, महापौर नीता ठाकरे , उपमहापौर लीला हातीबेंद्त, सत्तापक्ष नेते नरेंद्र बोरकर , विरोधी पक्षनेते संजय महाकाळकर तसेच प्रभारी आयुक्त वसुमना पंथ यांच्यासह अनेक अधिकारी उपस्थित राहतील.
पर्यावरणपूरक वाहतुकीकडे वाटचाल-
पहिल्या टप्प्यात ५० बस सेवेसाठी सज्ज असून पुढील काळात एकूण १५० विद्युत बस शहरात धावणार आहेत. इंधन बचत, प्रदूषणात घट आणि स्वच्छ वातावरण या दृष्टीने हा निर्णय महत्त्वाचा मानला जात आहे. नागपूरला हरित व शाश्वत शहर बनवण्याच्या प्रयत्नांना यामुळे बळ मिळणार आहे.
बसांची वैशिष्ट्ये-
-९ मीटर लांबी व २५+१ आसन व्यवस्था-
-दिव्यांग प्रवाशांसाठी विशेष उतार व्यवस्था
-३० मिनिटांत जलद विद्युत भारणानंतर सुमारे २२५ किलोमीटर धावण्याची क्षमता
-सुरळीत आणि अखंड सेवा
दरम्यान शहरातील ११ प्रमुख मार्गांवर टप्प्याटप्प्याने धावणार या नव्या बसांमुळे नागपूरकरांना अधिक सुरक्षित, आरामदायी आणि पर्यावरणस्नेही प्रवासाची सुविधा उपलब्ध होणार असून शहराच्या सार्वजनिक वाहतुकीला नवे बळ मिळणार आहे.








