नागपूर: सर्वांसाठी घरे-2022 या संकल्पनेवर आधारित प्रधान मंत्री आवास योजनेंतर्गत राज्यात 21 प्रकल्पांतर्गत 42 हजार घरे बांधण्यात येणार आहेत. प्रधान मंत्री आवास योजनेच्या या महत्वाकांक्षी योजनेचे भूमिपूजन प्रधान मंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते दिनांक 14 एप्रिल रोजी विभागीय क्रीडा संकूल येथे आयोजित कार्यक्रमात होत आहेत.
राज्यात प्रधान मंत्री आवास योजना प्रभावीपणे राबविण्याचा निर्णय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घेतला आहे. प्रधान मंत्री आवास योजनेंतर्गत सर्वांसाठी घरे ही संकल्पना राबवितांना घरांच्याकिंमतीत सर्व सामान्यांना परवडेल यासाठी केंद्र व राज्य शासनाचे अनुदानही या योजनेतील लाभार्थ्यांना मिळणार आहे. राज्यात ही योजना प्रभावी व परिणामकारक राबविण्यासाठी तसेच सर्वसामान्यांचे घराचे स्वप्न पूर्ण व्हावे या दिशेने म्हणून शासकीय जमीन नाममात्र एक रुपया चौरस मीटर या दराने देण्याचा निर्णय घेतला आहे. त्यासोबतच जागेच्या संयुक्त मोजणीसाठी दरात 50 टक्के सुट दिली आहे. आर्थिक दृष्टया कमकुवत घटकातील लाभार्थ्यांना प्रधान मंत्री आवास योजनेमध्ये स्टॅम्प ड्युटी एक हजार रुपये राहणार आहे. तसेच प्रकल्पाच्या विकास खर्चामध्ये सुध्दा सवलत देण्यात आली आहे.
प्रधान मंत्री आवास योजनेअंतर्गत राज्यात म्हाडातर्फे ही योजना राबविण्यात येत असून शासनाने या महत्वाकांक्षी प्रकल्पासाठी 460 एकर जागा उपलब्ध करुन देण्यात आली आहे. हा प्रकल्प 24 महिने ते 36 महिने पूर्ण करण्यात येणार असून त्यादृष्टीने प्रत्येक प्रकल्पाचा कालबध्द प्रकल्प अहवाल तयार करण्यात आला आहे. हा प्रकल्प सुमारे 3100 कोटी रुपयाचा आहे.
सर्वांसाठी घरे या महत्वकांक्षी प्रकल्पामध्ये चार घटक समाविष्ट आहे. यामध्ये जमिनीचा साधन संपत्ती म्हणून वापर करुन त्यावरील झोपडपट्यांचा आहे तेथेच पुनर्विकास करणे. कर्ज संलग्न व्याज अनुदानाच्या माध्यमातून आर्थिक दृष्टया दुर्बल आणि अल्प उत्पन्न असणाऱ्यांना पडवणारे घरांची निर्मिती करणे. खाजगी भागीदारीद्वारे पडवणाऱ्या घरांची निर्मिती करणे तसेच आर्थिक दृष्टया दुर्बल घटकातील लाभार्थांद्वारे वैक्यितीक स्वरुपाची घरकुल घटकाअंतर्गत अनुदान देणे या मार्गदर्शक सूचना पैकी म्हाडातर्फे भागीदारी तत्वार पडवणाऱ्या घरांची निर्मिती या घटकाअंतर्गत राज्यातील 142 शहरांमध्ये ही योजना राबविण्यात येणार आहे.
प्रधान मंत्री आवास योजनेअंतर्गत नागपूर मंडळाच्या कार्यक्षेत्रातील नागपूर शहरात वांजरा, चिखली देवस्थान येथे 497 घरांचे बांधकाम होणार आहेत. तसेच पिंपळगाव (वर्धा) येथे 534, वडधामना (नागपूर) येथे 2077, दाताळा (नवीन चंद्रपूर) येथे 324 घरांचे बांधकाम करण्यात येणार आहेत. अमरावती मंडळाअंतर्गत अकोली येथे 1218, शिवनी (अकोला) 255, बुलढाणा 304 घरांचा समावेश आहे. कोकण , पुणे , औरंगाबाद व नाशिक अशी एकूण 42 हजार 55 घरे बांधण्यात येणार आहेत. यामध्ये आर्थिक दृष्टया दुर्बल घटकातील कुटुंबासाठी 34 हजार 312, अल्प उत्पन्न 6557, मध्यम उत्पन्न 1062 तर उच्च उत्पन्न अंतर्गत 124 घरांचा समावेश आहे.