हायवेच्या जवळपास ५०० मीटरपर्यंत दारूबंदी करण्याच्या राज्य सरकारच्या निर्णयानंतर दारूच्या नशेत होणाऱ्या अपघातांची संख्या घटल्याचे समोर आले आहे. १ एप्रिल ते ३० जून या कालावधीत दारूच्या नशेत गाडी चालवणाऱ्यांची संख्या मागील वर्षीच्या तुलनेत तब्बल ४० टक्क्यांनी घटली आहे.
राज्य पोलिसांनी ही माहिती उपलब्ध करून दिली आहे. एप्रिल ते जून या कालावधीतल्या अपघाती मृत्यूंच्या प्रमाणात ११ ते १४ टक्क्यांनी घट झाली आहे तर किरकोळ अपघातांची संख्या २१ टक्क्यांनी कमी झाली आहे. पोलीस सहआयुक्त (वाहतूक) अमितेश कुमार म्हणाले, ‘हायवेवरील दारूबंदीचाच हा परिणाम आहे, असा आताच निष्कर्ष काढणे योग्य होणार नाही. पण हा सकारात्मक परिणाम झाला आहे हे खरे. पोलिसांनीही मोठ्या प्रमाणावर जनजागृती केली आहे. हॉटेलांमध्ये अल्को-बुथ्स उभारून गाडी चालवण्याआधी चालकांची रक्तातली अल्कोहोल पातळी पाहण्याच्या मोहिमेचाही लाभ झाला आहे.’
‘अपघातांच्या आकडेवारीचे बारकाईने निरीक्षण केले तर घटलेली संख्या राज्याच्या शहरातली तसेच निमशहरातली आहे. तिथे राष्ट्रीय आणि राज्य महामार्ग कमी आहेत. त्यामुळे दारुबंदीचाच हा परिणाम आहे, असे म्हणतात येणार नाही. शिवाय या मार्गांवरील ढाब्यांवर अजूनही दारू मिळते,’ असे एका वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्याने सांगितले. अबकारी विभागातल्या सूत्रांनुसार, हायवेवरील दारूबंदीमुळे बेकायदा दारू पुरवणाऱ्यांचाही सुळसुळाट झाला आहे. त्यांच्यावर धाडी पडल्यास अपघातांची संख्या आणखी घटेल.