Published On : Mon, Dec 18th, 2017

महा मेट्रोच्या नागपूर फेसबुक पानावर ४ लाख चाहते

Maha Metro, Nagpur Metro
नागपूर: नागपूर मेट्रोचे काम सुरु झाले तेव्हा ३ वर्षाआधी सुरु केलेले फेसबुक पान आज ४ लाख नागरिकांच्या पसंतीस उतरले आहे. संपूर्ण शहरात सुरु असणाऱ्या मेट्रो बांधकामाची अद्ययावत माहिती तपासणे आणि मनात येणाऱ्या शंकांचे निरसन करून घेणे त्यांच्या रोजच्या जगण्याचा एक भाग झाला आहे. प्रत्येक प्रश्नांची उत्तरं इथे मिळत असल्याने झपाट्याने चाहता वर्ग वाढणारं शहरातील हे लोकप्रिय अव्वल फेसबुक पान तर, संपूर्ण देशात इतर मेट्रो फेसबुक पानांमध्ये कोची मेट्रो ४३३ हजार एवढे लाईक्स असलेले पहिल्या नंबरवर तर नागपूर मेट्रो त्या नंतरचे दुसऱ्या क्रमांकाचे फेसबुक पान ठरले आहे. तसेच महाराष्ट्रातले आणि नागपूर शहरातील इतर नामवंत फेसबुक पानांमध्येही नागपूर मेट्रो पान हे प्रथम क्रमांकाचे लोकप्रिय पान म्हणून नावारूपास आले आहे.

नागपूर मेट्रोचे फेसबुक पान हे निव्वळ नागरिकांना आकर्षित करण्यासाठी म्हणून नसून इथे नियमित त्यांच्या प्रश्नांची उत्तरे दिली जाते. एका आठवड्याला ३ लाखावर नागरिक पानाला भेट देतात तसेच १७००० नागरिकांशी संवाद साधला जातो. ७०००० नागरिक आठवडाभऱ्यात कुठल्यातरी स्वरूपात पोस्टवर प्रतिसाद देतात. आजपर्यंत सुरु असलेल्या बांधकामाव्यतिरिक्त भविष्यात मेट्रोमुळे होणारे लाभ, शहराचा विकास, तांत्रिक बाबी, रोजगार अश्या सर्वव्यापी प्रश्नांना नागरिकांनी विचारलेल्या भाषेत तसेच त्यांना समजेल अश्या स्वरूपात सविस्तर उत्तरं देऊन त्यांचे समाधान केले जाते. या प्रश्नातून निर्माण होणाऱ्या शंका परस्पर जाऊन सोडवण्यासाठी दर महिन्याला नागरिकांच्या समस्त ‘मेट्रो संवाद’ नावाच्या कार्यक्रमाचे आयोजन केले जाते. या कार्यक्रमात त्या त्या विभागातील वरिष्ठ प्रत्यक्ष उपस्थित राहून नागरिकांशी हितगुज साधतात. निव्वळ तांत्रिक पोस्टच नाही तर वृक्षारोपण, मॅरेथॉन, स्केटिंग रॅली, कामगारांना राखी, पेड पे बात सारखे रेडिओ प्रोग्रॅम, माझे कॉलेज माझं स्टेशन सारखा विद्यार्थ्यांसाठी मनोरंजनात्मक शैक्षणिक इव्हेंट अश्या समाजोपयोगी कार्यक्रमांचे आयोजन तसेच सहयोग केंद्र आणि माहिती केंद्राच्या माध्यमातून नागरिकांना माहिती पुरवणे आणि कंट्रोल रूमच्या माध्यमातून येणाऱ्या समस्येवर त्वरित तोडगा काढणे अश्या अनेक माध्यमातून नागरिकांशी सलोख्याचे ऋणानुबंध जोडून घेण्याचा प्रयत्न नागपूर मेट्रो चमू सदैव करीत असते.

नागरिकांच्या फायद्याचे असणारे काही माहितीपूर्ण कार्यक्रम ‘फेसबुक लाईव्ह’ स्वरूपात तर व्यवस्थापकीय संचालक डॉ. ब्रिजेश दीक्षित यांचा नागरिकांसाठी असलेल्या सूचना अनेकदा व्हिडीओ रूपात नागरिकांपर्यंत पोचवले जातात. भारतीय परंपरेतले गणपती महोत्सव सारखे सणवार असतील किंवा पहिल्यांदा मेट्रोचे ट्रॅक किंवा डबे नागपुरात पोचल्याची पोचपावती असे अत्यंत आनंदाचे प्रसंग फेसबुक लाईव्ह करून नागरिकांसमवेत हा आनंद मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. नुकताच झालेला ‘इन्व्हेस्टर मीट’ कार्यक्रम लाईव्ह केला असता त्यात दिली गेलेली माहिती एकाच वेळी २००० दर्शक पाहत होते. याशिवाय बांधकाम स्थळावरून प्रवास करणाऱ्या नागरिकांनी त्यांच्या कॅमेराने टिपलेले छायाचित्र प्रकाशित करणे किंवा विविध कॉन्टेस्टच्या माध्यमातून शहरातील नागरिकांना जुळवून ठेवण्याचे काम हे फेसबुक पेज करते आहे. याकाळात फेसबुकवर प्रकाशित होणाऱ्या माहितीच्या आधारे महामेट्रोच्या पारदर्शी कामाची प्रचिती आल्याने नागरिकांचा विश्वास प्रगाढ होत जाऊन मेट्रो चमूसोबत सामाजिक कार्य करण्याची नागरिकांची रुची वाढत जाते आहे याच माध्यमातून जवळ जवळ ४४९७ मेट्रोमित्र या परिवारात सामील झाले आहेत.

आज अजून मेट्रो रुळावरून धावायची असूनही नागरिकांनी दाखवलेला विश्वास आणि सहकार्य या ४ लाखाच्या आकड्यावरून लक्षात घेता, पुढील कार्यप्रवास अधिक वेगाने आणि त्यांच्या विश्वासावर खरा उतरणारा होणार यात शंका नाही. याच आनंदी उत्साही घटनेचे साक्षीदार होता यावे म्हणून तो दि. १८ डिसेंबर रोजी संध्याकाळी ५ वाजता मेट्रो मित्रांसोबत डॉ. दीक्षित आणि चमूने उत्साहात साजरा केला. याप्रसंगी मा. ब्रिजेश दीक्षित, व्यवस्थापकीय संचालक महामेट्रो याप्रसंगी मा. ब्रिजेश दीक्षित, व्यवस्थापकीय संचालक महामेट्रो यांनी या यशाचे श्रेय नागपूरचे नागरिक आणि मैत्री मित्रांना दिले. यावेळी शिवाय एस. शिवमाथन, संचालक (वित्त), सुनील माथूर, संचालक (रोलिंग स्टॉक), अनिल कोकाटे, (महाव्यवस्थापक- प्रशासन) आणि मेट्रो मित्र तसेच चित्रकला महाविद्यालयाचे विद्यार्थी उपस्थित होते.