नागपूर: मुंबईहून ट्रेनद्वारे नागपूरमध्ये एमडी ड्रग्सची तस्करी करणाऱ्या दोन मुंबईकर तस्करांसह नागपूरच्या एका पेडलरला गुन्हे शाखा युनिट १ च्या पथकाने अटक केली आहे. सीताबर्डीतील हनुमान गल्लीत श्री कन्हैया हॉटेलजवळ सापळा रचून ही कारवाई करण्यात आली.
पोलिसांनी आरोपींकडून एकूण ६१८ ग्रॅम एमडी ड्रग्स (मूल्य ३२ लाख ४८ हजार रुपये) आणि इतर प्रतिबंधित साहित्य जप्त केले आहे. ही गेल्या काळातील मोठ्या प्रमाणात केलेली कारवाई मानली जात आहे आणि या घटनेमुळे संपूर्ण ड्रग्ज तस्करी साखळीत खळबळ उडाली आहे. वसीम खान इमदाद खान (३७, रा. बैगनवाडी, गोवंडी पूर्व, मुंबई), फखरुद्दीन उर्फ खिल्ली मैनुद्दीन कुरैशी (२६ रा. बैगनवाडी झोपडपट्टी, गोवंडी पूर्व, मुंबई), अब्दुल वसीम अब्दुल नवाब शेख (३४, रा. हंसपुरी, नागपूर) असे अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत.
गोपनीय माहितीच्या आधारे पोलिसांनी कारवाई करत तिघांना ताब्यात घेतले. श्री कन्हैया हॉटेलमध्ये ड्रग्जची डील होणार असल्याची माहिती मिळाल्यानंतर पथकाने वेळीच हस्तक्षेप केला. आरोपींना सीताबर्डी पोलिसांच्या स्वाधीन करण्यात आले असून, त्यांच्यावर विविध कलमांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
तपासात समोर आले की वसीम खान हा नियमितपणे ट्रेनने नागपूरमध्ये ड्रग्जचा पुरवठा करत असे आणि इथल्या खास ग्राहकांना थेट थोक भावाने माल विकत असे. तो यापूर्वीही अनेक वेळा नागपूरमध्ये आलेला आहे. क्राईम ब्रँचच्या या यशस्वी कारवाईबद्दल पोलिस आयुक्त डॉ. रवींद्र कुमार सिंघल यांनी संपूर्ण पथकाचे कौतुक केले आहे.











