नागपूर: महाराष्ट्र शासनाच्या गृहविभागाने नागपूर शहरासाठी पुन्हा 3 नवीन पोलिस ठाण्यांना मान्यता दिली असून वाठोडा, कपिलनगर, आणि पारडी ही तीन नवीन पोलिस ठाणे आहेत. या तीनही पोलिस ठाण्यांना मान्यता देतांना पोलिस कर्मचाऱ्यांच्या संख्येसह शासनाने मान्यता दिली आहे. नागपुरात सध्या 30 पोलिस ठाणे सुरू आहेत. नवीन 3 ठाण्यांमुळे ही संख्या आता 33 होणार आहे. कळमना पोलिस ठाण्याचे विभाजन करून पारडी पोलिस ठाणे निर्माण करण्यात येत आहे. कळमना ठाण्याचे क्षेत्र मोठे असल्यामुळे पोलिसांवरील कामाचा ताण वाढला. लोकसंख्या साडे तीन लाखाच्यावर गेल्यामुळे नवीन ठाणे निर्माण करणे ही आवश्यता होती व नागरिकांची मागणी होती. पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे व आ. कृष्णा खोपडे यांनी यासाठी प्रयत्न केले.
पारडी परिसरालगत राष्ट्रीय महामार्ग 6 असून हैद्राबाद जबलपूर बायपास मार्ग व दोन मोठ्या वसाहती आहेत. या परिसरात अपघात व वीज चोरीचे प्रमाण जास्त आहे. त्यामुळे सतत निर्माण होणाऱ्या कायदा व सुव्यवस्थेच्या प्रसंगामुळे नवीन पोलिस ठाणे निर्माण करण्याची गरज होती.
पारडी पोलिस ठाण्यात 2 पोलिस निरीक्षक, 10 पोलिस उपनिरिक्षक, 10 सहायक पोलिस उपनिरीक्षक, 45 पोलिस हवालदार, 85 पोलिस शिपाई, 6 चालक पोलिस शिपाई असे एकूण 158 पदे निर्माण करण्यास मान्यता देण्यात आली.
कपिलनगर ठाणे
जरीपटका पोलिस ठाण्याचे विभाजन करून कपिल नगर पोलिस ठाणे निर्माण करण्यास शासनाने मान्यता दिली आहे. जरीपटका पोलिस ठाण्यांतर्गत असलेली लोकसंख्या साडे तीन लाखापेक्षा अधिक असून वाढते शहरीकरण व वाढते औद्योगिकरण लक्षात घेता तसेच कायदा व सुव्यवस्थेची स्थिती नियंत्रणात राहण्यासाठी नवीन पोलिस ठाण्याची आवश्यकता होती. नागपूरच्या पोलिस आयुक्तांनी कपिलनगर पोलिस ठाणे निर्माण करण्याबाबतचा प्रस्ताव शासनाला सादर केला आहे.
कपिलनगर पोलिस ठाण्यालाही दोन पोलिस निरिक्षक, 15 पोलिस उपनिरिक्षक, 5 सहायक पोलिस निरिक्षक, 20 पोलिस हवालदार, 65 पोलिस शिपाई, 8 चालक पोलिस शिपाई व 2 सफाई कर्मचारी मिळून 117 पदांना निर्माण करण्याची मान्यता देण्यात आली आहे.
वाठोडा ठाणे
नंदनवन पोलिस ठाण्याचे विभाजन करून वाठोडा पोलिस ठाणे निर्माण करण्यास शासनाने मान्यता दिली आहे. नंदनवन पोलिस ठाण्याच्या क्षेत्रात लोक संख्येत वाढ झाली असल्यामुळे व कायदा व सुव्यवस्थेची स्थिती सुरळीत ठेवण्यासाठी वाठोडा पोलिस ठाण्याची निर्मिती करणे आवश्यक होते. वाठोडा पोलिस ठाण्यासाठी 2 पोलिस निरीक्षक 12 पोलिस उपनिरिक्षक, 5 सहायक पोलिस उपनिरिक्षक, 15 पोलिस हवालदार, 20 पोलिस शिपाई, 6 चालक पोलिस शिपाई अशा एकूण 60 पदांच्या निर्मितीसाठी शासनाने मान्यता दिली आहे.