Published On : Wed, Sep 13th, 2017

नवरात्र उत्सवासाठी ३८ बसेसच्या दररोज २७८ फेऱ्या

Advertisement

नागपूर: नवरात्रनिमित्त लाखोंच्या संख्येत भाविक कोराडी येथील मंदिरात दर्शनासाठी जात असतात. त्यांच्या सुविधेसाठी ३८ बसेसची व्यवस्था कऱण्यात आली आहे. या बसेस दर दिवशी २७८ फेऱ्या करणार आहे. तसेच दीक्षाभूमी येथे धम्मचक्र प्रवर्तन दिनानिमित्त ९५ बसेसची व्यवस्था करण्यात आली आहे. या बसेस विविध मार्गावर दर दिवशी ७३० फेऱ्या करणार आहेत, अशी माहिती परिवहन समिती सभापती बंटी (जितेंद्र) कुकडे यांनी दिली. विशेष म्हणजे नवरात्री पर्वावर फक्त महिलांसाठी विशेष बससेवा सुरु करण्यात येणार असल्याचेही त्यांनी सांगितले.

ज्येष्ठ नागरिकांना ५० टक्के सवलत

२ ऑक्टोबर रोजी गांधी जयंतीनिमित्त “स्वच्छ भारत अभियाना” अंतर्गत शहरातील ‘आपली बस’च्या १५८ स्टॉपची सर्व चालक, वाहक यांच्या श्रमदानातून स्वच्छता करण्यात येईल. यामध्ये सहभागी होण्याचे आवाहन नागरिकांना करण्यात येईल. २ ऑक्टोबरपासून “अटल बिहारी वाजपेयी ज्येष्ठ नागरिक योजने”ची सुरुवात करण्यात येणार असून ज्येष्ठ नागरिकांना तिकीट दरात ५० टक्के सवलत देण्यात येईल.

तिकीट दर “राऊंड ऑफ”

बस तिकीट काढत असताना चिल्लर नसल्यामुळे नागरिकांना वाहकाकडून उर्वरित पैसे देण्यात येत नसल्याच्या अनेक तक्रारी प्राप्त झाल्या आहेत. या तक्रारीनंतर अनेक मार्गावर कारवाईची धडक मोहीमही राबवून संबंधितांवर कारवाई करण्यात आली आहे. नागरिकांची ही अडचण कायमची सोडविण्यासाठी तिकीट दर “राऊंड ऑफ” करण्याच्या मानस परिवहन विभागाचा आहे. (उदा. ११ रुपये प्रवासी भाडे असलेल्या तिकीटाकरिता नागरिकांना १० रुपये द्यावे लागतील तर ९ रुपये तिकीटदर असलेल्या तिकीटासाठी नागरिकांना १० रुपये द्यावे लागतील) नागरिकांनी तिकीट घेऊनच प्रवास करावा, असे आवाहन सभापती बंटी कुकडे यांनी केले आहे. वाहकाकडून चिल्लर देण्यास टाळाटाळ होत असल्यास त्याची तक्रार परिवहन तक्रार निवारण केंद्र ०७१२-२७७९०९९ येथे संपर्क साधावा.

त्याचप्रमाणे मनपा आरोग्य विभागातील जे ऐवजदार कर्मचारी, परिवहन विभागात काम कऱण्यास उत्सुक आहे त्यांनादेखिल प्रशिक्षण देवून त्यांचेमार्फत बस सेवा सुरु करण्याचा मानस असल्याची माहिती परिवहन विभागाने दिली.