| | Contact: 8407908145 |
  Published On : Tue, Jul 4th, 2017

  27 हजार 932 प्रमाणपत्र विद्यार्थ्यांना मिळाले घरपोच

  Setu Office
  नागपूर
  : दहावी व बारावीच्या निकाल लागल्यानंतर पुढील प्रवेशाच्या आवश्यक असलेल्या जातीसह अधिवास, राष्ट्रीयत्व आदी प्रमाणपत्र मिळविण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयात सेतू केंद्रात होणारी गर्दी तसेच विद्यार्थी व पालकांचे गैरसोय टाळण्यासाठी जिल्हा प्रशासनातर्फे विविध शाळा व महाविद्यालयात आयोजित करण्यात आलेल्या विशेष शिबीरामुळे विद्यार्थ्यांना सहज व सूलभपणे घरपोच प्रमाणपत्र उपलब्ध झाले आहेत.

  विद्यार्थ्यांची होणारी गैरसोय टाळण्यासाठी तसेच सहज व सूलभपणे आवश्यक असणारे प्रमाणपत्र घरपोच देण्याचा उपक्रम जिल्हाधिकारी सचिन कुर्वे यांनी प्रथमच राबविला. या उपक्रमास पालक व नागरिकांकडून मिळालेल्या प्रतिसादामुळे फेब्रुवारी ते जून या पाच महिन्यात 27 हजार 932 विविध प्रमाणपत्र पोस्टाद्वारे घरपोच उपलब्ध करुन देण्यात आली आहेत. पोस्ट विभागाद्वारे घरपोच प्रमाणपत्र उपलब्ध करुन देण्याचा हा राज्यातील पहिलाचा उपक्रम असून या उपक्रमास जनतेकडूनही उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे.

  सेतू केंद्रात विविध प्रमाणपत्र घेण्यासाठी मोठ्या प्रमाणात गर्दी होऊ नये यासाठी शाळा व महाविद्यालयात तीन दिवसाचे विशेष शिबीर आयोजित करण्यात आले होते. त्यामुळे विद्यार्थ्यांनाही त्यांचाच महाविद्यालयात तसेच जेथे वास्त्वय आहे तेथील जवळच्या शिबिरामध्ये प्रमाणपत्र मिळविण्यासाठी आवश्यक असलेल्या अर्जासह सर्व दस्ताऐवज स्वीकारण्याची तसेच तेथेच मंजूर करण्याचेही व्यवस्था करण्यात आली होती. या व्यवस्थेमुळे विद्यार्थी व पालकांना त्यांच्या सुविधेनुसार प्रमाणपत्र मिळण्यासाठी अर्ज सादर करणे सुलभ झाले होते.

  विद्यार्थ्यांसाठी आयोजित करण्यात आलेल्या विशेष शिबीर अन्नपूर्णा देशमुख, सेंट ऊसुर्ला, स्वामी सितीरामदास, राजेंद्र हायस्कूल तसेच न्यू इंग्लिश हॉयस्कूल आदी शाळा व महाविद्यालयात दिनांक 10 ते 12 जून पर्यंत आयोजित करण्यात आले. या विशेष शिबिरामध्ये 8 हजार 940 विविध प्रमाणपत्र मिळविण्यासाठी अर्ज सादर झाले होते. यामध्ये शपथपत्रासाठी 4 हजार 347, उत्पन्नाच्या प्रमाणपत्रासाठी 1 हजार 971, जातीच्या प्रमाणपत्रासाठी 801, नॉन क्रिमिलेअर प्रमाणपत्रासाठी 775, तर वय, अधिवास, तसेच राष्ट्रीयत्व प्रमाणपत्रासाठी 1 हजार 046 अर्ज प्राप्त झाले होते. प्राप्त झालेल्या अर्जदाराला सर्वच प्रमाणपत्रे घरपोच पोस्टाद्वारे वितरीत करण्यात आले आहेत. या सुविधेमुळे पालकांना जिल्हा कचेरीत जावून अर्ज करणे तसेच यासाठी लागणारा प्रवासाचा आर्थिक बोजा तसेच वेळेचेही मोठ्या प्रमाणात बचत झाली आहे.

  सेतू केंद्रामधून मिळणाऱ्या प्रमाणपत्रासाठी अत्यंत पारदर्शक पध्दतीचा अवलंब करण्यात आला असून येथे होणारे गर्दी तसेच गैरसोय टाळावी यासाठी अर्ज सादर केल्यानंतर अर्जात असणाऱ्या त्रुटी अथवा अर्ज मंजूर होवून पोस्टाद्वारे प्रमाणपत्र वितरणासंदर्भातही तात्काळ अर्जदाराला माहिती व्हावी यासाठी एसएमएस सेवेचाही वापर करण्यात येत असल्यामुळे अर्जदारांना होणारा त्रास अथवा कोणाकडेही वारंवार जाण्याची आवश्यकता नाही.

  आपले सरकार पोर्टलवर ऑनलाईन अर्ज
  सेतु केंद्रामार्फत नागरिकांना आवश्यक प्रमाणपत्र उपलब्ध व्हावी यासाठी 22 काऊंटर सुरु करण्यात आली आहेत. सेतू केंद्रामार्फत वितरीत करण्यात येणाऱ्या प्रमाणपत्रासाठी दररोज एक हजार दोनशे ते दीड हजार अर्ज दाखल होतात. त्यामुळे अर्जाची तपासणी करण्यासाठी सर्वाधिक पाच काऊंटर ठेवण्यात आली आहे. त्यासोबत दोन काऊंटरवर शुल्क स्वीकारणे, तसेच आठ काऊंटरवर अर्ज सादर करण्याची सुविधा आहे. नागरिकांना सहज व सूलभपणे सेवा उपलब्ध व्हावी तसेच कुणीही मध्यस्थांची गरज भासू नये यासाठी मार्गदर्शन करण्यात येते.
  आपले सरकार या वेबसाईटच्या माध्यमातून प्रमाणपत्र मिळविण्यासाठी ऑनलाईन अर्ज स्विकारण्याची सुविधा उपलब्ध आहे. सेतू केंद्रामार्फत शपथपत्र, तसेच उत्पन्नाचे प्रमाणपत्र तात्काळ उपलब्ध करुन देण्याची विशेष व्यवस्था करण्यात आली आहे. यासाठी स्वतंत्र काऊंटर सुरु करण्यात आले आहेत. त्यामुळे नागरिकांना उत्पन्न अथवा शपथपत्रासाठी अर्धा ते दीड तासाच्या आत सुविधा उपलब्ध होत आहेत.

  Stay Updated : Download Our App
  Mo. 8407908145