Published On : Thu, Oct 14th, 2021

रस्ते दुरुस्तीसाठी २६ कोटींची मंजुरी

Advertisement

– खर्चाच्या नियोजनाला विशेष सभेची मंजुरी

नागपूर ः रस्त्यांवरील खड्डे बुजवण्यासाठी महापालिका प्रशासनाने अखेर २६ कोटी रुपयांचा निधी देण्यास मंजुरी प्रदान केली. महापालिकेच्या विशेष सभेत स्थायी समितीने सुमारे ४१.५० कोटींच्या प्रस्तावाला कात्री लावून ३६.५० कोटींच्या पुनर्नियोजनाला मंजुरी देण्यात आली. यात २६ कोटींचा निधी रस्त्यांसाठी तर सुमारे १० कोटींचा घनकचरा व्यवस्थापनासाठी मंजूर करण्यात आला.

सभापती प्रकाश भोयर यांनी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांसोबत बैठक घेत रस्त्यांच्या कामासाठी ४१.५० कोटींचा अतिरिक्त निधी इतर मंजूर केला होता. यासाठी हा निधी इतर विभागांच्या निधीतून वळते करण्याचे निश्चित करण्यात आले होते. रस्त्यांच्या कामासाठी उपलब्ध निधी पुरेसा नसल्याचे आयुक्त राधाकृष्णन बी. यांनी दोन आठवड्यापूर्वी झालेल्या महासभेत सांगितल्यानंतर, महापौर दयाशंकर तिवारी यांनी निधीचे पुनर्नियोजन करण्याचे आदेश दिले होते. महापालिकेच्यावतीने शहरातील रस्त्यांची देखभाल दुरुस्ती व डागडुजीसाठी सुमारे २०२१-२२च्या अर्थसंकल्पात सुमारे २४९ कोटींची तरतूद करण्यात आली आहे. करोनाच्या दीड वर्षांच्या काळात निधी अभावी रस्त्यांची कुठलीही कामे न झाल्याने रस्त्यांवर गेल्यावर्षीच्या तुलनेत ४० टक्के अधिक खड्डे तयार झाल्याचे प्रशासनाकडूनच सभागृहात सांगण्यात आले होते.

अशी केली विभागनी
नव्याने केलेल्या खर्चाच्या नियोजनात आठ कोटी रुपयांचा निधी हॉटमिक्स प्लान्टद्वारे रस्त्यांवरील खड्डे बुजवण्यासाठी, तर ५ कोटी रुपयांचा निधी डांबरीकरण वाढवून देण्यात आला आहे. राष्ट्रसंत तुकडोजी महाराज रस्ते विकास कार्यक्रमासाठी १० कोटींच्या निधीची तरतूद आणि घनकचरा व्यवस्थापनासाठी १० कोटींची तरतूद करण्यात आली आहे.

नासुप्रची मदत घेणार
रस्ते दुरुस्तीसाठी महापालिकेच्या हॉटमिक्स प्लान्ट बरोबरच नागपूर सुधार प्रन्यासच्या हॉटमिक्स प्लान्टची मदत घेण्यात येणार आहे. आतापर्यंत महापालिकेच्या हॉटमिक्स प्लान्टच्या माध्यमातून रस्त्यांची कामे करण्यात येत होती. हिंगणा येथे असलेल्या या प्लान्टमधून प्रतितास ३० टन डांबर तयार करण्याची क्षमता आहे. मात्र, नासुप्रच्या बॅचमिक्स प्लान्टची क्षमता प्रतितास ८० ते १०० टन इतकी आहे. त्यामुळे महापालिका या कामासाठी नासुप्रची मदत घेणार आहे. दहा दिवसांसाठी नासुप्रचा हॉटमिक्स प्लान्ट वापरणार आहे. पावसाळा संपताच या कामांना सुरूवात होणार आहे.