
नागपूर, : नागपूर शहराचा वाढता विस्तार आणि जुन्या वस्त्यांमधील अरुंद रस्ते लक्षात घेता, आपत्कालीन परिस्थितीत अग्निशमन दलाची मोठी वाहने पोहोचण्यात येणारे अडथळे आता दूर होणार आहेत. नागपूर महानगरपालिकेच्या अग्निशमन विभागात २००० लिटर क्षमतेचे ६ नवीन ‘मिनी फायर टेंडर’, शहरातील ‘डोअर-टू-डोअर’ कचरा संकलन करणारी २५ नवीन वाहने आणि लहान अरुंद नाल्यांची सफाई करण्यासाठी २ पोकलेन मशीन व नदी सफाई करण्याकरिता १ लाँगबूमचे महापौर श्रीमती निता ठाकरे यांच्या हस्ते सोमवारी (ता. २३) मनपाच्या मुख्यालयात लोकार्पण करण्यात आले.
मनपा मुख्यालय येथील छत्रपती शिवाजी महाराज प्रशासकीय भवन येथे या वाहनांना महापौर श्रीमती निता ठाकरे यांनी हिरवी झेंडी दाखविली. याप्रसंगी उपमहापौर श्रीमती लिला हाथीबेड, सत्ता पक्षनेते श्री. नरेंद्र (बाल्या) बोरकर, नगरसेवक श्री. विजय होले, मनपा आयुक्त डॉ. अभिजीत चौधरी, अतिरिक्त आयुक्त श्रीमती वसुमना पंत, अतिरिक्त आयुक्त श्रीमती वैष्णवी बी, उपायुक्त श्री. मंगेश खवले, मुख्य स्वच्छता अधिकारी डॉ. गजेंद्र महल्ले, मुख्य अग्निशमन अधिकारी श्री. तुषार बारहाते, कारखाना विभागाचे कार्यकारी अभियंता श्री. राजेश गुरमुळे, उपअभियंता श्री.उज्वल लांजेवार, विभागीय स्वच्छता अधिकारी श्री. सागर हारगुडे, धरमपेठ झोनचे झोनल स्वच्छता अधिकारी श्री. लोकेश बासनवार यांच्यासह मनपाचे इतर अधिकारी-कर्मचारी आदी उपस्थित होते.
नागपूर शहराचे क्षेत्रफळ सुमारे २२७ चौ.कि.मी. असून शहराचा विस्तार झपाट्याने होत आहे. काही भागांत रस्ते अरुंद असल्याने आगीच्या घटना घडल्यास मोठे बंब वेळेवर पोहोचू शकत नाहीत, ज्यामुळे जीवित व वित्त हानीचा धोका निर्माण होतो. हा अडथळा ओळखून सन २०२४-२५ च्या अर्थसंकल्पीय तरतुदीतून सुमारे ६ कोटी ७ लाख ३८ हजार २५८ रुपये खर्च करून ६ नवीन ‘मिनी फायर टेंडर’ खरेदी करण्यात आले आहेत. सोलापूर येथील मे. देवी फायर सर्व्हिस यांनी या वाहनांचे फेब्रिकेशन पूर्ण केले असून, ८ जानेवारी २०२६ रोजी ही वाहने मनपाला प्राप्त झाली. यापूर्वीच्या ४ आणि नवीन ६ अशा एकूण १० मिनी फायर टेंडरमुळे गजबजलेल्या आणि अरुंद रस्त्यांच्या भागात तातडीने सेवा देणे शक्य होणार असून, शहराच्या अग्निशमन यंत्रणेची क्षमता अधिक बळकट झाली आहे. याशिवाय मनपाच्या अग्निशमन दलात १६००० हजार लिटरचे एकूण ७ फायर टेंडर, ५००० हजार लिटरचे १४ फायर टेंडर, ७० मीटरचे एक हायड्रोलिक प्लॅटफॉर्म, ३२ मीटरचे १ हायड्रोलिक प्लॅटफॉर्म आणि 42 मीटरचे 01 टीटीएल अशी आणीबाणी काळात सेवा देण्यास तत्पर आहेत.
कचरा संकलनासाठी नवी 25 वाहने
याशिवाय, महापौर निता ठाकरे यांनी घनकचरा व्यवस्थापन विभागाच्या मालकीच्या ‘डोअर-टू-डोअर’ कचरा संकलन करणाऱ्या २५ नवीन वाहनांनाही हिरवी झेंडी दाखविली. ही वाहने जुन्या वाहनांची जागा घेणार असून, यातील ५ कचरा संकलन वाहने झोन ६ ते १० मध्ये आणि २० कचरा संकलन वाहने झोन १ ते ५ या दरम्यान कचरा संकलनाच्या कामाला गती देतील. बी.व्ही.जी. आणि ए.जी. या दोन्ही कचरा संकलन कंपनी कडून 4,47,09,271/- वसूल करण्यात आलेल्या दंडाची रक्कमे मधून 25 वाहनांची खरेदी करण्यात आली आहे.
नाले सफाईसाठी पोकलेन
तसेच पावसाळ्यापूर्वी नाल्यांची सफाई करण्याकरिता २५ टनाची १ लाँगबूम आणि लहान नाल्यांच्या सफाईसाठी ५ टन व ३.५ टनाचे २ पोकलेन मनपात दाखल झाले आहेत. यामध्ये जेसीबीची एक आणि टाटा हिताची एनएक्स ५० ची एक अशा दोन मशीनचा समावेश आहे. या सर्व सेवा नागपूरकरांच्या सुविधेसाठी समर्पित करताना, मनपा नेहमीच जनतेच्या सेवेसाठी कटिबद्ध असल्याचे प्रतिपादन महापौर निता ठाकरे यांनी यावेळी केले.










