नागपूर: नागपूर महानगरपालिकेच्या परिवहन विभागाच्या २३० भंगार बसेसची लिलाव प्रक्रीया दिवाळीपूर्वी पूर्ण करण्यात यावी. ही लिलाव प्रक्रीया नियमानुसार करावी, असे निर्देश अध्यक्ष प्रवीण भिसीकर यांनी दिले. मंगळवारी (ता.१८) परिवहन विभागातील जुन्या भंगार बसेसची विल्हेवाट लावण्याकरीता गठीत केलेल्या उपसमितीची बैठक मनपा मुख्यालयातील डॉ.पंजाबराव देशमुख सभागृहात आयोजित करण्यात आली. त्याप्रसंगी ते बोलत होते.
यावेळी समिती सदस्य नितीन साठवणे, सदस्या अर्चना पाठक, परिवहन व्यवस्थापक शिवाजी जगताप, प्रशासकीय अधिकारी अरूण पिपुरडे, यांत्रिकी अभियंता योगेश लुंगे, समितीचे सल्लागार पी.ए.जोशी, राज्य परिवहन महामंडळाचे विभागीय भांडार अधिकारी डी.व्ही.टेंभुर्णे, राज्य परिवहन महामंडळाचे अधिकारी उल्हास वैद्य, श्री. भारद्वाज, लेखा व वित्त विभागाचे विलास कावळे प्रामुख्याने उपस्थित होते.
समितीचे सल्लागार श्री. जोशी यांनी बसेसच्या लिलावाची प्रक्रीया कशी असेल याबाबत बैठकीमध्ये माहिती दिली. लिलावासाठी विक्री करण्यात येणा-या बसेसचे आर.सी. रजीट्रेशन रद्द करणे आवश्यक आहे. त्या रद्द केलेल्या रजीट्रेसशनचे कागदपत्र आल्यानंतरच प्रकीया सुरू करण्यात येईल, असे त्यांनी यावेळी सांगितले. बसेसच्या प्रकारानुसार त्याची विभागणी करून बसेसचे स्लॉट करण्यात यावे, असेही त्यांनी सांगितले. बसेसचे ऑफसेट मुल्य ठरविण्यासाठी बसेसचे सर्वेक्षण करणे आवश्यक आहे. यासाठी परिवहन विभागाने तीन ऑपरेटरसाठी तीन चमू सर्वेक्षणासाठी तयार करण्यात येणार आहे. प्रत्येक बस मागे एक शीट अशा २३० शीट तयार करण्यात येणार असून त्याचा अहवाल पुढच्या दहा दिवसात समितीपुढे सादर करण्यात येणार असल्याची माहिती परिवहन व्यवस्थापक शिवाजी जगताप यांनी दिली.
सर्वेक्षणासाठी येणा-या चमूला भंगारातील बसेस या मोकळ्या करून देण्यात यावा तसेच भंगार बसेसच्या भवताल असलेली गवत कापून तो परिसर स्वच्छ ठेवण्यात यावा, असे निर्देश समिती सभापती प्रवीण भिसीकर यांनी दिले. भंगार बसेसचे सर्वेक्षण ३० सप्टेंबर पर्यंत पूर्ण झाले पाहिजे, असे निर्देशही सभापती श्री.भिसीकर यांनी दिले. लिलावासाठी एक ऑक्शनर शोधून त्याची नेमणूक प्रशासनाने करावी, असेही श्री.भिसीकर यांनी सांगितले. दिवाळीपूर्वी म्हणजे ३० ऑक्टोबर पर्यंत भंगार बसेसचा लिलाव व विल्हेवाट पूर्ण करावी, असेही निर्देश प्रवीण भिसीकर यांनी दिले.