Published On : Wed, Feb 21st, 2018

भंगारातील २३० बसेसचा होणार लिलाव

Advertisement


नागपूर: नागपूर महानगरपालिकेच्या शहर बस वाहतूक सेवेअंतर्गत वंश निमय लि.ने चालविलेल्या १० वर्षांपूर्वी आलेल्या २३० स्टार बसेस सध्या भंगारात पडल्या आहेत. त्याची किंमत पुन्हा कमी होण्याच्या अगोदर त्याचा लिलाव करण्यात येईल, असा निर्णय नगरसेवक प्रवीण भिसीकर यांच्या अध्यक्षतेखाली असलेल्या परिवहन उपसमितीने घेतला.

यासंदर्भात मंगळवारी (ता. २१) डॉ. पंजाबराव देशमुख स्मृति सभागृहात बैठक पार पडली. बैठकीला उपसमितीचे अध्यक्ष प्रवीण भिसीकर, सदस्य अर्चना पाठक, नितीन साठवणे परिवहन विभागाचे वरिष्ठ व्यवस्थापक शिवाजी जगताप, परिवहन विभागाचे रवींद्र पागे, वंश निमयचे प्रतिनिधी अजिंक्य पारोळकर, अलोणे उपस्थित होते.

बैठकीत उपसमितीने प्रारंभी भंगारात असलेल्या बसविषयी माहिती घेतली. २३० बसेस असून त्यापैकी १२४ ऑरेंज सिटी स्ट्रीट येथे तर १०६ बसेस टेका नाका येथे आहेत. या बसेचा कालावधी १० वर्षांपेक्षा अधिक झाल्यामुळे त्या भंगार झाल्या आहेत. त्याची किंमत कमी होण्याअगोदर त्याचा लिलाव करण्याचा निर्णय यावेळी घेण्यात आला. न्यायालय आणि शासनाच्या नियम व अटी-शर्तींच्या अधीन राहून लिलाव प्रक्रिया करण्याचे निर्देश उपसमितीचे अध्यक्ष प्रवीण भिसीकर यांनी दिले. यासाठी मनपा आणि व्हीएनअसायएलच्या सदस्यांची संयुक्त समिती गठित करण्यात आली असून या समितीद्वारे ही संपूर्ण प्रक्रिया पार पडणार असल्याची माहिती भिसीकर यांनी दिली.