
नवी दिल्ली – प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेअंतर्गत येणारा 21 वा हप्ता 19 नोव्हेंबर रोजी देशभरातील शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होणार आहे. केंद्र सरकारने या तारखेची अधिकृत तयारी पूर्ण केली असून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते हप्त्याचे वितरण करण्यात येणार आहे. सुमारे 10 कोटी लाभार्थी शेतकऱ्यांना प्रत्येकी 2,000 रुपये थेट जमा केले जातील.
शेतकऱ्यांची पडताळणी प्रक्रिया जवळपास संपली असून बँकांनाही निधी हस्तांतरणासाठी अंतिम सूचना देण्यात आल्या आहेत. रब्बी हंगाम सुरु करण्याच्या घडीला ही आर्थिक मदत शेतकऱ्यांसाठी मोठा आधार ठरणार आहे.
काही राज्यांना मात्र हा हप्ता आधीच मिळाल्याचे दिसून आले. पूर, पावसाचे नुकसान आणि भूस्खलनाचा फटका बसलेल्या पंजाब, हरियाणा आणि हिमाचल प्रदेश या राज्यांना 26 सप्टेंबरला आगाऊ निधी दिला गेला. त्यानंतर जम्मू-काश्मीर मधील शेतकऱ्यांनाही 7 ऑक्टोबरला मदत वितरित करण्यात आली. आता उर्वरित राज्यांतील शेतकरी 19 नोव्हेंबरला हप्त्याची वाट पाहत आहेत.
योजनेचा मागील 20 वा हप्ता 2 ऑगस्ट रोजी वितरित करण्यात आला होता. वाराणसीतून झालेल्या या वितरणावेळी लाखो शेतकऱ्यांच्या खात्यात डिजिटल प्रणालीद्वारे मोठी रक्कम जमा करण्यात आली होती.
2019 मध्ये सुरू झालेली पीएम-किसान योजना आज देशातील 10 कोटींच्या पुढील शेतकरीवर्गापर्यंत पोहोचली आहे. वर्षातून तीन वेळा दिली जाणारी एकूण 6,000 रुपयांची मदत शेतकऱ्यांच्या शेतीसंबंधी गरजांसाठी महत्त्वाची ठरत असून केंद्र सरकार या योजनेला आणखी सक्षम करण्याच्या तयारीत आहे.









