Published On : Thu, Jul 18th, 2019

२१ गावांचा कारभार चालतो २ कर्मचारी व एका रोखपालावर!

टाकळघाट येथील बँक ऑफ इंडियात कर्मचाऱ्यांचा अभाव

टाकळघाट: येथील राष्ट्रीयकृत बँक ऑफ इंडिया हि एकमेव शाखा असून या बँकेत कर्मचाऱ्यांचा अभावामुळे ग्राहकांना सुविधा पुरविण्यास हि बँक अपयशी ठरत आहे.या बँक ऑफ इंडिया अंतर्गत २१ गाव येत असून या गावांचा कारभार हा दोन कर्मचारी व एक रोखपाल यांच्या भरोसावर चालत असून यामुळे ग्राहकांना नाहक त्रास सहन करावा लागतो.

टाकळघाट शाखेच्या अंतर्गत जवळपास २१ ते २२ गावे येत असून त्यात टाकळघाट,खापरी,गोंडवाना,भांसुली,किन्ही,गांधीखापरी,कान्होलिबारा,आसोला,सावंगी,घोडेघाट,आजंगाव,वडगावबक्षी,लोधिभांसुली,हळदगाव,गणेशपुर,सुकळी बेलदार,टेंभरी,वाटेघाट,पोही,मांडवा अशा एकूण २१ ते२२ गांवाचा समावेश होतो.या सर्व गावांचा आर्थिक व्यवहार हा याच बँकेतून चालत असून दीर्घकालीन व अल्पकालीन कर्ज,पंतप्रधान मुद्रा योजना,संजय गांधी निराधार योजना,पेन्शन योजना,शाळेतील मुलामुलींचे खाते ओपन,पीक कर्ज,सुवर्ण गहाण व तारण,व्यापारी सी सी खाते ,अशा अनेक प्रकारच्या माध्यमातून आर्थिक व्यवहार चालत असतात.

या मुळे असंख्य ग्राहक ,शेतकरी,शेतमजूर,कंपनीमधील कामगार वर्ग,निराधार वृद्ध,विधार्थांचा संबंध या बँकेशी येत असतो.परंतु या बँकेत एकही क्लर्क नसल्याने दिवसंदिवस काम पेंडिंग राहत असतात यासाठी ग्राहकांना अत्यंत गरजेच्या सुविधांकरिता बँकेत चकरा टाकाव्या लागत असतात यामुळे येथील बँकेबद्दल ग्राहकांची नाराजगी दिसून येत आहे.

येथील ग्राहकांना क्षुल्लक कारणासाठी दिवस भर बँकेच्या रांगेत उभे राहावे लागतात.शेतकरी आपली कामे सोडून बँकेचा हेल्पट्या घालत असतात.काही दिवसांअगोदर येथील दोन ऑफिसर च्या बद्दल्या करण्यात आल्या. त्यांच्या जागी फक्त एक ऑफिसर ची नियुक्ती करण्यात आली. याचा त्रास ग्राहकांना व येथील शाळकरी मुलांना होताना दिसून येत आहे.

याकरिता संबंधित अधिकाऱ्यांनी लक्ष देऊन रिक्त असणारे पद तात्काळ भरती करून ग्राहकांना होत असलेला त्रास दूर करावा अशी मागणी परिसरातील ग्राहकांनी केली आहे.

संदीप बलविर