Published On : Thu, Oct 25th, 2018

सिंदी येथील ड्राय पोर्ट व्‍दारे 2000 रोजगार निर्मित – नितीन गडकरी

Advertisement

नागपूर: वर्धा जिल्‍हयातील सिंदी रेल्‍वे येथे सुमारे 500 कोटी रूपयाची गुंतवणूक करून यातील 50 एकर अधिग्रहीत जागेवर रेल्‍वे ब्रॉडग्रेज कोचनिर्मितीचा कारखाना सिंदी रेल्‍वे येथे उभारण्‍यात येणार आहे. यातून सुमारे 2,000 रोजगार निर्मिती होणार आहे. हे पोर्ट विदर्भाच्या विकासाचे ‘ग्रोथ इंजीन’ म्हणून काम करेल .याच्या विकासासाठी जे.एन.पी.टी. सॅटलाइट पोर्ट म्‍हणून सिंदी ड्राय पोर्टच्‍या अध्‍यपदी हिंगणघाटचे आमदार श्री. समीर कुणावार यांची नियुक्‍ती झाल्‍याचे केंद्रीय रस्ते वाहतूक, महामार्ग, व केंद्रीय जलसंपदा मंत्री श्री. नितीन गडकरी यांनी आज हिंगणघाट, वर्धा येथे जाहीर केले.

राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणातर्फे वर्धा-यवतमाळ जिल्‍हयातील राष्ट्रीय महामार्गावरील विविध विकासकार्यांचे भूमीपूजन व लोकार्पण आज त्‍यांच्या अध्‍यक्षतेखाली झाले, त्‍यावेळी ते बोलत होते. याप्रसंगी उद्घाटक म्‍हणून महाराष्ट्राचे मुख्यमंत्री श्री. देवेंद्र फडणवीस, प्रमुख अतिथी म्‍हणून केंद्रीय गृहराज्यमंत्री हंसराज अहीर,वर्ध्याचे खासदार रामदास तडस, हिंगणघाटचे आमदार समीर कुणावार उपस्थित होते. याप्रसंगी मुख्‍यमंत्र्यांच्‍या हस्‍ते राष्‍ट्रीय माहामार्ग 44 वरील 1.15 कि.मी लांबीच्‍या हिंगणघाट येथील 30 कोटीच्‍या रेल्‍वे उडाणपूल, बडनेर ते देवधरी या 29 कि.मी. व 280 कोटीच्या मार्गाचे चौपदरीकरण व सुमारे 200 कोटी रूपयाच्‍या खर्चाचे केळापूर ते पिंपळखूटी या 22 कि.मी. लांबीच्‍या मार्गाचे चौपदरीकरण या कार्यांचे लोकार्पण करण्‍यात आले.

वर्धा यवतमाळ जिल्‍हयातील 480 कोटी रूपयांचे काम कंत्राटदाराअभावी रखडले होते. पण राष्‍ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्‍या पुढाकाराने आता ते पूर्ण झाले आ‍हेत. 2 ऑक्‍टोबर 2017 रोजी केंद्र शासनातर्फे घोषित करण्‍यात आलेल्‍या वर्धा पॅकेज अंतर्गत 6,948 कोटी रूपये मंजूर झाले, त्‍या विकास कार्याची वचन पूर्ती सुमारे 7 हजार कोटीच्या कामांना कार्यादेश देऊन होत आहे,असे गडकरीनी यावेळी सांगितले व या सिमेंट कॉक्रीटच्या रस्त्यांना पुढील 100 वर्ष खड्डे पडणार नाहीत, अशी ग्वाही उपस्थितांना दिली. नागपूर लोकसभा संघात सुमारे 66 हजार कोटीचे कामे सुरु असून विदर्भाच्या सर्वांग़ीण विकासासाठी पुढकार घेत असतांना महाराष्ट्रातील इतर भागाकडे दुर्लक्ष होणार नाही, याकडे त्यांनी यावेळी लक्ष वेधले.

राष्‍ट्रीय महामार्ग 44 वरील जाम येथे उडडाणपूलाचे 1.16 कि.मी.लांबीच्‍या व 98.76 कोटी खर्चाच्‍या कामालाही मंजूरी देण्‍यात आल्‍याचे त्‍यांनी यावेळी जाहीर केले. याशिवाय नांदगांव चौक हिंगणघाट येथे उड्डाणपूल, वर्धा ते हिंगणाघाट मार्गाचे क्रॉंकीटीकरणासह दुपरीकरण, सेलडोह – सिंदी रेल्‍वे – सेवाग्राम – पवनार मार्गाचे क्रॉंकीटीकरणासह दुपरीकरण, वर्धा – आर्वी मार्गाचे क्रॉंकीटीकरणासह दुपरीकरण, आर्वी ते तळेगांव मार्गाचे क्रॉंकीटीकरणासह दुपरीकरण, व तळेगाव ते गोणापूर मार्गाचे क्रॉंकीटीकरणासह दुपरीकरण या सुमारे 1,374 कोटी रूपयांच्‍या तरतूदीच्‍या विकास कार्याचे भूमीपूजनही त्यांच्या उपस्थितीत करण्‍यात आले.

राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणातर्फे बांधण्‍यात येणा-या ब्रीज कम बंधा-यामध्‍ये प्रत्‍येकी 7 ब्रीज कमबंधारे यवतमाळ व वर्धा जिल्‍हयात बांधले जाणार असल्‍याची माहिती त्‍यांनी दिली.

देशाच्‍या स्‍वातंत्र्यापासून 2014 पर्यंत राष्ट्रीय महामार्गाची लांबी 5 हजार किमी होती पण 2014-18 या चार वर्षाच्‍या काळात सुमारे 20 हजार किमीच्‍या राष्ट्रीय महामार्गांना मंजूरी मिळाली आहे. मुख्‍यमंत्री ग्रामीण सड़क योजनेच्‍या माध्‍यमातून 30 हजार किमी लांबीचे ग्रामीण रस्‍ते पूर्ण करण्‍याचा निर्धार आपण केला असून त्‍यातील 500 कि.मी. लांबीचे रस्‍ते हे वर्धा जिल्‍हयात असतील. केंद्र शासनाच्‍या पंतप्रधान आवास योजनेच्‍या माध्‍यमातून एकही जण बेघर राहणार नाही, याची दक्षता महाराष्‍ट्र शासन घेईल असे मुख्यमंत्री श्री. देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी सांगितले.

केंद्रीय रस्ते व वाहतूक, महामार्ग मंत्रालयातर्फे करण्‍यात येणा-या कामामूळे संपूर्ण विदर्भातील जिल्हे विकासाच्‍या प्रवाहात आले असून त्‍यांचा सर्वांगीण विकास होण्‍याकडे मंत्रालयाचे प्रयत्‍न चालू आहेत, अशी भावना केंद्रीय गृहराज्‍यमंत्री हंसराज अहीर यांनी यावेळी व्‍यक्‍त केली.

या कार्यक्रमाप्रसंगी हिंगणघाटचे आमदार श्री. समीर कुणावार यांच्‍या मतदार संघातील विकासकार्याचा अहवालाचे डिजीटल लोकार्पण मान्‍यवरांच्‍या हस्‍ते करण्‍यात आले. कार्यक्रमाचे प्रास्‍ताविक राष्‍ट्रीय महामार्ग प्राधिकरणाचे तांत्रिक सदस्‍य डी.ओ.तावडे यांनी केले तर आभार प्रदर्शन प्रादेशिक अधिकारी श्री. चंद्रशेखर यांनी केले. या कार्यक्रमात हिंगणघाट, वर्धा, यवतमाळ जिल्‍हयातील स्‍थानिक लोकप्रतिनिधी, राष्‍ट्रीय महामार्ग प्राधिकरण, सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिकारी, कर्मचारी व स्‍थानिक नागरिक उपस्थित होते.