नागपूर : विधानसभा निवडणुकीत महायुती सरकारला बहुमत मिळवून देण्यात लाडक्या बहिणींचा मोलाचा वाटा आहे. आता या योजनेसाठी निकषांची चाचपणी करण्यात येत आहे. राज्यातील इतर योजनांच्या माध्यमातून सरकारच्या आर्थिक लाभाचा फायदा घेणाऱ्या महिलांना या लाडकी बहीण योजनेतून वगळण्यात येण्याची दाट शक्यता आहे. सरकारच्या निकषाचा फटका शेतकरी महिलांना बसण्याची शक्यता असून जवळपास २० लाख महिलांना वगळण्यात येणार असल्याची माहिती समोर येत आहे.
‘या’ महिला ठरणार अपात्र –
मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या पडताळणीत केंद्र सरकार आणि राज्य सरकारच्या शेतकरी योजनेचा लाभ घेणाऱ्या महिला अपात्र ठरण्याची भीती व्यक्त केली जात आहे. पंतप्रधान शेतकरी सन्मान योजना व राज्य सरकारच्या नमो शेतकरी सन्मान योजनेतील 19 लाख 20 हजार 85 शेतकरी बहिणीवर लाभ कपातीची टांगती तलवार आहे. यामुळेच सरकारी योजनांचा लाभ घेतलेल्या बहिणीसाठी ही योजना सुरू ठेवायची की नाही, याचा धोरणात्मक निर्णय घेण्याची कसरत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वातील महायुती सरकारला घ्यावा लागणार आहे.
20 लाख महिलांवर अपात्रतेची टांगती तलवार –
मोठा फटका शेतकरी महिलांना बसण्याची शक्यता आहे. शेतकरी सन्मान योजनेत सुमारे 20 लाख, राज्य शासनाच्या कृषी थेट लाभ हस्तांतरण (ॲग्री डीबीटी) योजनेतील 10 लाख 90 हजार 465 जणांना सरकारच्या निकषांचा फटका बसू शकतो. तिन्ही योजनेतील 30 लाख 10 हजार 550 शेतकरी बहिणींवर ‘मुख्यमंत्री लाडकी बहीण योजने’तून अपात्र होण्याची टांगती तलवार आहे.