Published On : Mon, May 14th, 2018

खरीप हंगामासाठी कापूस बियाण्यांची २ कोटी पाकिटे उपलब्ध – कृषिमंत्री

मुंबई: खरीप 2018 मध्ये कापूस लागवडीसाठी राज्यात 42 कंपन्यांच्या माध्यमातून 2 कोटी पाकिटे बियाणे उपलब्ध करुन देण्यात येणार असून साधारणत: 40 लाख हेक्टर क्षेत्रावर कापूस पिकाचे नियोजन करण्यात आले आहे. या वर्षी प्रथमच सुमारे 5 हजार बियाण्यांचे नमुने पेरणीपूर्व तपासणीचे नियोजन करण्यात आले आहे, असे कृषिमंत्री पांडुरंग फुंडकर यांनी आज येथे सांगितले.

मंत्रालयात खरीप 2018च्या नियोजनासाठी कापूस बियाणे उत्पादक कंपन्यांसोबत बैठक झाली. त्यावेळी कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत, विभागाचे अपर मुख्य सचिव विजयकुमार, आयुक्त सचिंद्र प्रताप सिंह आदी उपस्थित होते.

कृषिमंत्री श्री. फुंडकर म्हणाले, राज्यात 41 लाख हेक्टर क्षेत्रावर कापूस पिकाखालील सर्वसाधारण क्षेत्र असून या खरीप हंगामासाठी 40 लाख हेक्टर क्षेत्रावर पेरणी करण्यात येणार आहे. त्यासाठी 1 कोटी 60 लाख बियाणे पाकिटांची गरज असून या वर्षी 2 कोटी 54 हजार पाकिटांची उपलब्धता करुन देण्यात आली आहे. यंदा बियाणे कंपन्यांनी त्यांच्या गोदामातून नमुने काढूनच विक्री करण्याच्या शासनाच्या धोरणास सकारात्मक प्रतिसाद दिला आहे. या हंगामात कापसाच्या 376 वाणांना परवानगी देण्यात आली असून 26 दीर्घकालावधी वाणास परवानगी नाकारण्यात आली आहे.

ज्या बियाणे कंपन्यांनी गुजरातमध्ये बियाणे उत्पादन कार्यक्रम राबविला आहे, अशा ठिकाणाहून एचटीबीटी बियाणे येणार नाही याची दक्षता कंपन्यांना घेण्यास सांगितले आहे. शेतकरी बांधवांनी देखील परवानगी असलेल्या वाणांचीच लागवड करावी. पूर्वहंगामी लागवड करु नये असे आवाहन यावेळी कृषिमंत्र्यांनी केले. राज्यात अनधिकृत बियाण्यांविरोधात धडक मोहिम राबविण्यात आली असून अशा बियाण्यांचे साठे जप्त करण्यात आले आहे.

कापूस बियाणे उत्पादनाच्या 74 को मार्केटिंग कंपन्यांच्या 248 वाणांना विक्रीची परवानगी देण्यात आली नाही. बियाण्यांची परवानगी देताना डीयूएस गुणधर्म, डीएनए या सुविधा व विद्यापीठ चाचण्यांची अट अनिवार्य केली आहे.

शेंदरी बोंडअळीचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी या वर्षी हंगामपूर्व लागवड होऊ नये याकरिता 15 मे पूर्वी बियाण्यांची उपलब्धता न करुन देण्याबाबत सांगण्यात आले आहे. बोंडअळीच्या नियंत्रणासाठी शेतात फेरोमेन ट्रॅप (कामगंध सापळे) लावण्यात यावे. त्याचबरोबर कृषी विद्यापीठांनी शिफारस केलेले कीटकनाशके वापरावीत. जहाल विष असलेले कीटकनाशक फवारण्याची आवश्यक नाही, असे कृषिमंत्र्यांनी यावेळी सांगितले.

कापूस बियाण्यांची आणि खताची मुबलक प्रमाणात उपलब्ध करुन शेतकरी बांधवांना दर्जेदार व गुणवत्तापूर्ण बियाणे मिळण्यासाठी कृषी विभागाने अधिक लक्ष द्यावे, असे आवाहन कृषिमंत्र्यांनी यावेळी केले. बैठकीस कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांसमवेत विविध बियाणे उत्पादक कंपन्यांचे प्रतिनिधी उपस्थित होते.