मुंबई: महिला उद्योजकांना चालना देण्यासाठी महाराष्ट्र शासनाने कोल्हापूरमधील कसबा करवीर येथील २.५ हेक्टर जमीन ‘सावित्रीबाई फुले महिला सहकारी औद्योगिक वसाहत लि., कोल्हापूर’ या संस्थेला प्रदान केली आहे.
राज्य मंत्रिमंडळाची बैठक मुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली आज झाली. यावेळी महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या पुढाकाराने निर्णय घेण्यात आला आहे
गेल्या अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेल्या या प्रस्तावाला अखेर मूर्त स्वरूप आले आहे. ‘सावित्रीबाई फुले महिला सहकारी औद्योगिक वसाहत’ संस्थेने ‘महिलांची औद्योगिक वसाहत स्थापन करणे’ या उद्देशाने ही जमीन मिळवण्यासाठी अर्ज केला होता. त्यांच्या प्रयत्नांना यश देत राज्य सरकारने ही जमीन विना-लिलाव, भोगवटादार वर्ग-२ या धारणधिकाराने देण्याचा निर्णय घेतला आहे. ही जमीन कोल्हापूर शहराच्या मंजूर विकास योजनेत औद्योगिक वापरासाठी आरक्षित आहे. शासनाने ही जमीन विशिष्ट अटी-शर्तींसह प्रदान केली आहे. यामध्ये संस्थेने एका वर्षात विस्तृत आराखडा (डिपीआर) तयार करून उद्योग सुरू करणे, केवळ मंजूर प्रयोजनासाठीच जमिनीचा वापर करणे, शासकीय परवानगीशिवाय जमीन हस्तांतरित न करणे यासारख्या अटींचा समावेश आहे.
या निर्णयामुळे कोल्हापूर आणि आसपासच्या परिसरातील महिलांना उद्योग आणि रोजगाराच्या संधी मिळण्यास मोठी मदत होईल.