Published On : Tue, Apr 10th, 2018

१९ वर्षीय तरुणाच्या मृत्यूनंतर संतप्त नातेवाईकांचा दवाखान्यात हंगामा


नागपूर: लोकमत चौकातील ‘मिडास हाईट्स’ इमारतीमधील खाजगी दवाखान्यात मंगळवारी एका १९ वर्षीय तरुणाचा मृत्यू झाला. त्याच्या उपचारामध्ये दुर्लक्ष झाल्याचा आरोप करून त्याच्या नातेवाईकांनी दवाखान्यात हंगाम करत तोडफोड केल्याने वातावरण तापले होते. वेळेवर पोलिसांनी मध्यस्थी करीत प्रकरण शांत केले.

तुषार आसोरीया नामक १९ वर्षीय युवकाला काविळीच्या त्रासामुळे मिडास हाईट्स येथील डॉ. श्रीकांत मुकेवार यांच्या दवाखान्यात ७ दिवसांपूर्वी भरती करण्यात आले होते. नातेवाईकांच्या मते डॉक्टरांनी तुषारची प्रकृती सुधारत असल्याचे सांगितले होते. परंतु मंगळवारी त्याचा मृत्यू झाला. डॉ. मुकेवार यांच्या दवाखान्यात उपचार घेण्यापूर्वी त्याचावर अन्य डॉक्टरकडे उपचार सुरु होते.

तुषारचा भाऊ मयूरने सांगितले की, सोमवारी तब्बेत जास्त खालावल्याने तुषारला व्हेंटिलेटर लावण्यात आले होते. तसेच त्याच्या मृत्यूची बातमी सकाळी ५ वाजून १५ मिनिटांनी देण्यात आली, परंतु वैद्यकीय अहवालात मात्र ८ वाजताची वेळ नमूद करण्यात आली आहे.


त्याचप्रमाणे तुषारवरील उपचारांची जबाबदारी एमबीबीएस डॉक्टरकडे देण्याऐवजी बीएएमएस डॉक्टरकडे सोपवण्यात आली होती. त्यामुळे त्याला व्यवस्थित उपचार मिळू शकले नाहीत असा आरोप तुषारच्या नातेवाईकांनी केला आहे. संतप्त नातेवाईकांनी केलेल्या तोडफोडीत दवाखान्याचे आणि लिफ्टचे तुटल्याची माहिती आहे.

उपचारात हेळसांड झाल्याच्या आरोप इस्पितळ व्यवस्थापनाने फेटाळला
तर उपचारांमध्ये हेळसांड झाल्याच्या आरोपांना इस्पितळ प्रशासनाने नाकारले आहे. डॉ. श्रीकांत मुकेवर यांनी सांगितले की, जेव्हा तुषारला भरती करण्यात आले तेव्हा त्याची प्रकृती जास्त खराब होती आणि बिलिरुबिन सुद्धा वाढलेली होती. त्यातच त्याचे मूत्रपिंड सुद्धा निकामी झाले होते. ज्यामुळे त्याच्या परिवाराला अवयव प्रत्यारोपणाची माहिती देण्यात आली होती.