
नागपूर : नंदनवन पोलिस ठाण्याच्या हद्दीत १९ वर्षीय युवतीला लग्नाचे आमिष दाखवून तिच्यावर वारंवार अत्याचार केल्याचा आरोप समोर आला आहे. याप्रकरणी युवतीच्या तक्रारीवरून पोलिसांनी २६ वर्षीय युवकाविरुद्ध संबंधित कलमांनुसार गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, युवती नंदनवन परिसरात तिच्या मैत्रिणीच्या घरी गेली होती. त्यावेळी ती मैत्रिणीच्या शेजारी राहणाऱ्या आपल्या मावशीला भेटण्यासाठी गेली. मात्र, मावशी घरी नसल्याने तिचा २६ वर्षीय मुलगा तेथे होता. आरोपीने युवतीला घरात बसवून तिच्याशी बातचीत केली आणि लग्न करण्याचे आश्वासन दिल्याचा आरोप आहे.
यानंतर आरोपीने युवतीच्या इच्छेविरुद्ध तिच्याशी शारीरिक संबंध प्रस्थापित केल्याचे तक्रारीत नमूद आहे. तसेच त्यानंतरही त्याने अनेकदा तिच्याशी शारीरिक संबंध ठेवल्याचा आरोप युवतीने केला आहे.
दरम्यान, युवतीने आरोपी आणि त्याच्या कुटुंबीयांकडे लग्नाबाबत विचारणा केली असता त्यांनी लग्नास नकार दिल्याचे तक्रारीत म्हटले आहे. त्यानंतर युवतीने नंदनवन पोलिस ठाण्यात धाव घेत तक्रार दाखल केली.
या तक्रारीवरून पोलिसांनी आरोपी युवकाविरुद्ध गुन्हा नोंदवून पुढील तपास सुरू केला आहे. आरोपीला अद्याप अटक करण्यात आलेली नसल्याची माहिती पोलिसांनी दिली.




