Published On : Thu, Aug 29th, 2019

मौदा तालुक्यात 19 हजार शेतकर्‍यांना मिळणार किसान सन्मान योजनेचा लाभ : पालकमंत्री

Advertisement

नागपूर: जिल्ह्यातील मौदा तालुक्यातील 19 हजार शेतकर्‍यांना केंद्र शासनाच्या पंतप्रधान किसान सन्मान योजनेचा लाभ मिळणार असून या सर्व शेतकर्‍यांची ऑनलाईन नोंदणी झाली आहे. या शेतकर्‍यांच्या खात्यात ही रक्कम लवकरच जमा करण्यात येणार असल्याची माहिती पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी आज दिली.

बाबदेव येथे माथनी व बाबदेव या परिसरातील नागरिकांशी थेट संवाद साधण्यासाठी जनसंवाद कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी ही माहिती समोर आली. याप्रसंगी माजी जि.प. अध्यक्ष निशा सावरकर, हरीश जैन, सरपंच धर्मेद्र येळणे, हेमराज सावरकर, योगेश वाडीभस्मे, नरेश मोटघरे, टेकचंद सावरकर, आनंद लेंडे, विजय हटवार, बेनीराम तिघरे, वीरेंद्र पायतोडे, विष्णुजी देशमुख, योगेश येळणे, प्रवीण कारेमोरे, बबलू गुजर आदी उपस्थित होते. पालकमंत्री बावनकुळे पुढे म्हणाले- किसान सन्मान योजनेप्रमाणेच शेतकर्‍यांसाठी पेन्शन योजनाही केंद्र शासनाने आणली आहे. 18 ते 40 वयोगटातील शेतकर्‍यांनी पेन्शन योजनेचा फॉर्म भरावा. वयाच्या 60 वर्षानंतर शेतकर्‍याला 3 हजार रुपये पेन्शन सुरु होईल. शेतकर्‍याच्या मृत्यूनंतर त्याच्या पत्नीलाही पेन्शनचा लाभ मिळणार आहे. पालकमंत्री पांदन योजनेअंतर्गत 105 किमीचे रस्ते झाले असून हे सर्व रस्ते बांधण्याचा निर्णय लवकरच शासन स्तरावर होणार आहे.

बाबदेव भागातील जनसुविधेसाठी 8 कोटी 30 लक्ष रुपये मंजूर झाले आहे. यात नवेगाव, लापका, बाबदेव, धामणगाव आदी गावांचा समावेश आहे. या 96 कामांसाठी जिल्हा नियोजन मधून निधी उपलब्ध होणार आहे. जिल्हा परिषदेकडे 113 प्रस्ताव प्रलंबित आहेत. या भागासाठी 6 अंगणवाड्यांचे बांधकामाचे नकाशे मंजूर झाले आहे. तसेच शासकीय इमारत दुरुस्तीचे 6 प्रस्ताव मंजूर झाले आहेत. तांडा वस्तीसाठज़ी 5 कोटींची कामे होणार आहेत. सर्वांसाठी घरे योजनेत तीन हजार प्रस्ताव ऑनलाईन प्राप्त झाले असून त्यापैकी एक हजार घरे मंजूर होणार आहेत. 2.5 लाख रुपयात हे घर गरीब माणसाला दिले जाणार आहे. तसेच पंतप्रधान आवास योजनेचा पहिला आणि दुसरा टप्पा मंजूर झाला आहे.

कृषी विभाग अधिकार्‍याने माहिती सांगताना सांगितले की, 70 टक्के पाऊस तालुक्यात झाला असून 41419 हेक्टरवर पेरणी झाली आहे. अजून कोणत्याही पिकावर किडीचा प्रादुर्भाव नाही. 5 हजार हेक्टर शेतीवर पट्टा पध्दतीने काम सुरु असून 10 हजार हेक्टर पिकाचा पीक विमा काढला आहे. महावितरणने आपल्या कामांचा आढावा घेताना सांगितले की, जिल्ह्यात 1100 कोटी रुपयांची कामे सुरु आहेत. यात 40 उपकेंद्र उभारण्यात आले असून या भागात आणखी 6 उपकेंद्र उभारले जाणार आहे. पुढची 25 वर्षे विजेच्या कोणत्याही समस्या उभ्या राहणार नाहीत, अशा पध्दतीने कामे सुरु आहेत.

कुठेही भारनियमन नाही. थकबाकीसाठी कोणत्याही शेतकर्‍याचा वीजपुरवठा खंडित करण्यात आला नसल्याचेही अधीक्षक अभियंत्यांनी सांगितले.
तालुक्यातील 8143 शेतकर्‍यांना शासनाने 47.51 कोटींची कर्जमाफ केले आहे. या सर्व शेतकर्‍यांना कर्जमाफी झाल्याचे पत्र पाठविण्याच्या सूचनाही पालकमंत्र्यांनी दिल्या. जिल्हा परिषद बांधकाम आणि ग्रामीण पाणीपुरवठा व अन्य विभागांनी आपल्या विभागाचा आढावा सादर केला. बाबदेव येथील एनटीपीसीच्या सभागृहात झालेल्या या कार्यक्रमाला मोठ्या संख्येने नागरिक व महिला उपस्थित होत्या.