Published On : Fri, Jun 22nd, 2018

नागपूर जिल्ह्यात १८३ बालके कुपोषित

नागपूर: जिल्ह्यात कुपोषणाचा प्रश्न ग्रामीण भागात अजूनही तसाच गंभीर आहे. जिल्ह्यात कुठे कुपोषित बालकांची संख्या वाढत चालली आहे तर कुठे या संख्येत घट होतो आहे. नुकतीच जिल्ह्यातील आंगणवाडी स्तरावर सहा महिने ते सहा वर्ष वयोगटातील बालकांची आरोग्य तपासणी करण्यात आली आहे. या तपासणीत जिल्ह्यातील १८३ बालके ही तीव्र कुपोषित असल्याचे लक्षात आले आहे. या बालकांना कुपोषणाच्या निकषातून बाहेर काढण्याकरीता आंगणवाडीत दररोजच्या आहाराशिवाय अतिरिक्त आहार व औषधोपचार देण्यात येत आहे.

सामान्य, मध्यम व तीव्र असे कुपोषणाचे निकष असतात. साधारणत: आदिवासी क्षेत्रात कुपोषित बालकांचे जास्त प्रमाण आढळून येते असा समज आहे. मात्र, बिगर आदिवासी क्षेत्रातील लहान बालकांच्या कुपोषणावर प्रभावीपणे मात करण्यासाठीही शासन ग्राम बालविकास केंद्र ही योजना राबविण्यात येत आहे. जिल्ह्यात कार्यरत २४२३ आंगणवाड्यातील ग्राम बालविकास केंद्राच्या माध्यमातून जिल्ह्यातील सहा महिने ते सहा वर्षे वयोगटातील बालकांचे आरोग्य विभागातील अधिकारी व आंगणवाडी सेविका, परिचारिका यांच्या माध्यमातून जागतिक आरोग्य संघटना (डब्ल्यूएचओ)च्या निकषानुसार आरोग्य तपासणी करण्यात येत आहे.

आतापर्यंत जिल्ह्यातील ३० हजारावर नमूद वयोगटातील बालकांची तपासणी करण्यात आली आहे. यात जिल्ह्यात तब्बल १८३ बालके ही तीव्र कुपोषित असल्याचे आढळून आले आहे. डब्ल्यूएचओच्या निकषानुसार या बालकांचे उंचीनुसार वजन मोजण्यात आले. मात्र, ते निकषापेक्षा कमी आढळून आले. तीव्र कुपोषित बालकांना घरच्या नियमित आहाराशिवाय आंगणवाडीच्या माध्यमातून ७ वेळा नियमित व अतिरिक्त असा आहार पुरविण्यात येत आहे. सकाळी ८ ते सायंकाळी ८ यावेळेत हा आहार पुरविला जातो. या आहारात केळी, अंडी तसेच विशेष औषधोपचार देण्यात येत आहे, अशी माहिती जिल्हा परिषदेचे महिला व बालविकास अधिकारी भागवत तांबे यांनी दिली आहे.