
नागपूर : अमली पदार्थांविरोधात राबविण्यात येत असलेल्या “ऑपरेशन थंडर – लेट अस युनाइट फॉर अ ड्रग-फ्री सोसायटी” मोहिमेअंतर्गत हिंगणा पोलिसांनी जामठा परिसरात मोठी कारवाई करत १६.९४ किलो गांजा जप्त केला आहे. जप्त मुद्देमालाची अंदाजे किंमत ४ लाख २० हजार ८०० रुपये इतकी आहे.
ही विशेष मोहीम नागपूर शहर पोलिस आयुक्त रवींद्र कुमार सिंगल यांच्या मार्गदर्शनाखाली राबविण्यात येत असून अमली पदार्थांची विक्री, साठवणूक आणि सेवन यावर आळा घालण्याचे उद्दिष्ट आहे.
गुरुवारी सकाळी सुमारे ११.३५ वाजताच्या सुमारास जामठा येथील एका हॉटेलचे मालक गुरविंदर चोप्रा यांनी हिंगणा पोलिस ठाण्याला हॉटेलच्या मागील बाजूस दोन संशयास्पद बॅगा पडून असल्याची माहिती दिली. पोलिसांनी पंचांच्या उपस्थितीत पाहणी केली असता एका हातगाडीखाली लपवून ठेवलेली गडद हिरव्या रंगाची बॅग आढळली. या बॅगेत ९ पॅकेटमध्ये १०.९३६ किलो गांजा होता.
तसेच पिवळसर-तपकिरी रंगाच्या दुसऱ्या बॅगेत ६ पॅकेटमध्ये ६.००४ किलो गांजा सापडला. दोन्ही बॅगा आणि त्यातील एकूण १६.९४० किलो गांजा जप्त करण्यात आला.
प्राथमिक चौकशीत खासगी बसने नागपूरात आलेल्या एका अज्ञात प्रवाशाने संशय निर्माण झाल्याने या बॅगा हॉटेलच्या मागील बाजूस टाकून पळ काढल्याचा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे.
पीएसआय वसंता शेडमाके यांच्या तक्रारीवरून अज्ञात आरोपीविरुद्ध अमली पदार्थ प्रतिबंधक कायदा (NDPS Act) कलम २०(ब), ११(क) आणि ८(क) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास हिंगणा पोलीस करीत आहेत.
अमली पदार्थांविरोधातील या धडक कारवाईमुळे जामठा परिसरात खळबळ उडाली असून पोलिसांकडून खासगी बसमार्गे होणाऱ्या तस्करीकडे विशेष लक्ष दिले जात आहे.








