नागपूर :कर्तव्यात सातत्याने हलगर्जीपणा आणि ८५ दिवसांहून अधिक कालावधीपर्यंत अनुपस्थित राहिल्यामुळे नागपूर ग्रामीण पोलिस विभागातील एक उपनिरीक्षक आणि १२ अन्य पोलिस कर्मचाऱ्यांना निलंबित करण्यात आले आहे. ग्रामीण पोलिस अधीक्षक हर्ष पोद्दार यांनी ही कारवाई करताच पोलिस दलात खळबळ उडाली आहे.
निलंबित कर्मचाऱ्यांमध्ये मुख्यालयातील १ पोलिस उपनिरीक्षक, १ पोलिस हवालदार, ७ पोलिस शिपाई, ३ पोलिस नाईक, तसेच कलमेश्वर, नरखेड आणि सावनेर येथील प्रत्येकी १ हवालदार आणि मोटार परिवहन विभागातील १ पोलिस शिपायाचा समावेश आहे.
या १३ कर्मचाऱ्यांविरुद्ध कर्तव्यात गंभीर दुर्लक्ष आणि वारंवार गैरहजेरी असे आरोप असून, यामुळे पोलिस खात्याच्या शिस्तीवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले होते. अधीक्षक पोद्दार यांनी याबाबत वारंवार सूचना देऊनही सुधारणा न झाल्यामुळे अखेर निलंबनाची कारवाई केली.
ही कारवाई ग्रामीण पोलिस दलात शिस्त आणि जबाबदारीचे भान ठेवण्यासाठी एक कडक पाऊल मानले जात असून, भविष्यात अशा प्रकारच्या हलगर्जीपणाला बिलकूल क्षमा केली जाणार नाही, असा संदेश या निर्णयातून दिला जात आहे.