हाथरस: उत्तर प्रदेशातील हाथरस येथे सत्संगानंतर झालेल्या चेंगराचेंगरीच्या घटनेत १२१ जण ठार झाल्याची धक्कदायक घटना घडली. तर अनेक जण जखमी झाले आहेत. स्थानिक पोलिसांनी याप्रकरणी मुख्य स्वयंसेवक देवप्रकाश मधुकर आणि इतर अज्ञातांसह आयोजकांविरुद्ध भारतीय न्याय संहिता कलमांखाली एफआयआर दाखल करण्यात आला आहे.
एफआयआरनुसार, आयोजकांनी ८० हजार लोकांच्या मेळाव्यासाठी परवानगी मागितली होती. परंतु, या कार्यक्रमात तब्बल अडीच लाखांहून अधिक जमले होते. तसेच, त्यांच्यावर पुरावे बदलण्यात आल्याचेही आरोप आहे.
या सत्संगात संबोधन नारायण साकार हरी नावाचे बाबा करत होते. बाबांकडून आशीर्वाद घेण्यासाठी एक लाखापेक्षा अधिक भाविक पोहोचले होते. हातरस दुर्घटनेच्यावेळी तिथे उपस्थित असलेल्या लोकांनी जे सांगितले ते हृदय पिळवटून टाकणारे होते. भोले बाबांनी सत्संगस्थळ सोडल्यानंतर त्यांचा स्पर्श झालेली माती गोळा करण्याकरता गर्दी जमली. त्यासाठी लोक जमिनीवर पसरले होते. यामुळे चेंगराचेंगरी झाली.
या चेंगराचेंगरीत भाविक जवळ असलेल्या नाल्यात पडले,अशी माहिती उत्तर प्रदेशचे महासचिव मनोज कुमार सिंग यांनी दिली.मृतांमध्ये महिला आणि मुलांचे प्रमाण अधिक असण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.