Published On : Sat, Jun 20th, 2020

ससून रुग्णालयातील कोवीड-१९ चाचण्यांची क्षमता वाढवण्यासाठी १२ कोटी ४४ लाखांचा निधी – अजित पवार

Advertisement

उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी घेतला कोरोना प्रतिबंध उपाययोजनांचा आढावा…
अवाजवी शुल्क आकारणी करणाऱ्या रुग्णालयांवर कारवाई करा…
उपचारात हलगर्जीपणा करणार्‍या डॉक्टरांची गय केली जाणार नाही…

पुणे – कोरोना प्रतिबंधाच्या दृष्टीने चाचण्यांची क्षमता वाढविणे आवश्यक आहे, त्यादृष्टीने पुण्यातील ससून रुग्णालयाच्या चाचण्यांची क्षमता वाढवण्यासाठी १२ कोटी ४४ लाख रूपयांचा निधी मंजूर करण्यात आल्याची माहिती आज उपमुख्यमंत्री तथा पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार यांनी दिली.

दरम्यान अवाजवी शुल्क आकारणी करणाऱ्या रुग्णालयांवर कारवाई करा असे निर्देशही उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी यावेळी दिले.

विभागीय आयुक्त कार्यालयातील ‘झुंबर हॉल’ मध्ये उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली ‘कोरोना’ संसर्ग प्रतिबंधात्मक उपाययोजनांच्या अनुषंगाने आढावा बैठक आयोजित करण्यात आली होती.

या बैठकीला महापौर मुरलीधर मोहोळ, विभागीय आयुक्त डॉ. दीपक म्हैसेकर, जमाबंदी आयुक्त एस.चोक्कलिंगम, पुणे पोलीस आयुक्त डॉ. के.व्यंकटेशम, जिल्हाधिकारी नवल किशोर राम, पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्त संदिप बिष्णोई, पुणे मनपा आयुक्त शेखर गायकवाड, पिंपरी चिंचवड मनपा आयुक्त श्रावण हर्डीकर, सहकार आयुक्त अनिल कवडे, साखर आयुक्त सौरभ राव, पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाचे आयुक्त विक्रम कुमार, पशुसंवर्धन आयुक्त सचिंद्र प्रताप सिंग, भूजल विकास व सर्व्हेक्षण विभागाचे संचालक कौस्तुभ दिवेगावकर, अतिरिक्त आयुक्त रुबल अग्रवाल, जिल्हा पोलीस अधीक्षक संदीप पाटील, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद, ससूनचे प्रभारी अधिष्ठाता डॉ. मुरलीधर तांबे, आरोग्य विभागाचे निवृत्त महासंचालक डॉ. सुभाष साळुंखे आदींसह विविध विभागांचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

कोवीड-१९ स्राव नमुना तपासणीसाठी लागणा-या साधनसामुग्रीसाठी ८ कोटी ९० लाख ९७ हजार रुपयांचा तर यंत्रसामुग्रीसाठी ३ कोटी ५३ लाख ६ हजार रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे. याशिवाय इतर आवश्यक यंत्रसामुग्रीसाठी ७ कोटी १५ लाख ८१ हजार रुपयांचा निधीही देण्यात आला आहे. या निधीतून कोरोना प्रतिबंधासाठी आवश्यक वैद्यकीय साधन सामुग्रीची खरेदी करता येणार आहे. याशिवाय परिसेविका व अधिपरिचारिकांच्या भरण्यात आलेल्या पदासाठी आवश्यक निधी देण्यात आला असल्याचेही अजित पवार यांनी सांगितले.

कोवीड-१९ चाचण्यांचे अहवाल वेळेत देण्याचे निर्देश देत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी कोवीड-१९ स्राव नमुने तपासणी करणाऱ्या प्रयोगशाळासांठी आवश्यक मनुष्यबळ महापालिका प्रशासनाने तातडीने उपलब्ध करून द्यावे तसेच ससून, नायडू, यशवंतराव चव्हाण रुग्णालयासह अन्य रुग्णालयांमध्ये रुग्णसंख्या तसेच मृत्यूसंख्येची माहिती अद्ययावत होत असल्याची खात्री प्रशासनाने करावी, तसेच कोवीड आणि इतर आजारांच्या रुग्णांच्या उपचारात हलगर्जीपणा करणाऱ्या डॉक्टरांची गय केली जाणार नाही असे स्पष्ट निर्देशही उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिले.

कोरोना रुग्णांवर वेळेत उपचार होण्याच्या दृष्टीने कोणत्याही परिस्थितीत निधीची कमतरता भासू दिली जाणार नाही असे सांगून अत्यावश्यक बाबींसाठी जिल्हा वार्षिक योजनेच्या निधीतून खर्च करावा, तसेच ससून रुग्णालयातील यंत्रसामुग्रीयुक्त अद्ययावत करा, असे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सांगितले.

महापौर मुरलीधर मोहोळ यांनी स्राव नमुने तपासणी तसेच अतिदक्षता विभागातील बेड क्षमतेत वाढ करण्याची गरज असल्याचे सांगून यादृष्टीने महानगरपालिका प्रयत्नशील असल्याचे सांगितले.
डॉ. सुभाष साळुंखे यांनी गरजूंना खाटा उपलब्ध करून देण्यासाठी नियोजन करणे आवश्यक असल्याचे सांगितले. विभागीय आयुक्त डॉ. दिपक म्हैसेकर यांनी मृत्यूदर कमी करण्यासाठी प्रशासनाच्या वतीने करण्यात येणाऱ्या उपाययोजनांची माहिती दिली.

जमाबंदी आयुक्त एस.चोक्कलिंगम यांनी ससून रुग्णालयातील डॉक्टरांच्या सेवांचे दिवसनिहाय नियोजन करण्यात आल्याने कामात सुसूत्रता आल्याचे सांगितले.

जिल्हाधिकारी नवल किशोर राम म्हणाले, पुणे शहरानजीक असलेल्या ग्रामीण भागात रुग्णसंख्या नियंत्रणात आणण्यासाठी प्रशासन प्रयत्नशील असल्याचे सांगितले तसेच यापूर्वी रुग्ण आढळलेल्या तालुक्यातील रुग्णसंख्या कमी करण्यात यश आल्याचे सांगितले.
तसेच यावेळी महापालिका आयुक्त शेखर गायकवाड तसेच श्रावण हर्डीकर यांनी महापालिकेच्यावतीने कोरोना नियंत्रणासाठी करण्यात येत असलेल्या उपाययोजनांची माहिती दिली.

बैठकीत स्राव तपासणी क्षमता, पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या, वैद्यकीय पार्श्वभूमी, वॉर्डनिहाय रुग्णसंख्या, कंटेन्मेंट झोन निहाय स्थिती, संस्थात्मक क्वारंटाईन क्षमता, ज्येष्ठ नागरिकांची तपासणी, ग्रामीण भागातील स्थिती तसेच उपचारसुविधा आदी विषयांचा सविस्तर आढावा घेण्यात आला.

यावेळी उपस्थित अधिकाऱ्यांनी कोरोना नियंत्रणासाठी करण्यात येत असलेल्या उपाययोजनांची माहिती दिली.