अमरावती : महाराष्ट्रातील शेतकरी आत्महत्यांचा आकडा दिवसेंदिवस चिंताजनक पातळीवर पोहोचत आहे. जानेवारी ते ऑगस्ट २०२५ या आठ महिन्यांत राज्यभरात तब्बल ११८३ शेतकऱ्यांनी आत्महत्या केली आहे. केवळ यवतमाळ जिल्ह्यात ऑगस्ट महिन्यातच ४४ शेतकऱ्यांनी जीवनयात्रा संपवली आहे.
या एकूण ११८३ आत्महत्यांपैकी ६०७ शेतकरी पात्र, तर ३०६ अपात्र ठरले असल्याची माहिती प्रशासनाने दिली. क्षेत्रवार पाहता, गेल्या आठ महिन्यांत छत्रपती संभाजीनगर विभागात ५२०, तर पश्चिम विदर्भात ७०७ आत्महत्यांची नोंद झाली आहे.
राज्यातील एकूण १४ जिल्हे आत्महत्या-प्रवण मानले गेले आहेत. यामध्ये ६ विदर्भातील आणि ८ मराठवाड्यातील जिल्ह्यांचा समावेश आहे.
शेतकऱ्यांच्या आत्महत्येमागील प्रमुख कारणांमध्ये अतिवृष्टी, कर्जबाजारीपणा, शेतीमालाला योग्य भाव न मिळणे आणि नैसर्गिक आपत्ती हे घटक ठळकपणे पुढे आले आहेत.
तज्ज्ञ आणि प्रशासनाचा इशारा आहे की, जर शेतकऱ्यांसाठी प्रभावी मदत व दिलासा योजना तत्काळ राबवल्या गेल्या नाहीत, तर आत्महत्यांचा हा आकडा आणखी वाढू शकतो.