नागपूर: आगामी काळात विजेची वाढणारी मागणी लक्षात घेऊन महावितरणकडून जिल्ह्यात १०८४ कोटी रुपयांची कामे सुरु असून त्या अनुषंगाने जिल्ह्यातील वीज ग्राहकांना अखंडित वीज पुरवठा मिळणार असल्याची माहिती राज्याचे ऊर्जा मंत्री तथा नागपूर जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी आज येथे आयोजित जिल्हा विदुयत नियंत्रण समितीच्या बैठीकीत दिली. .
जिल्हाधिकारी कार्यालयातील बचत भवनात आयोजित बैठकीच्या अध्यक्ष स्थानी समितीचे अध्यक्ष गिरीश देशमुख उपस्थित होते. नागपूर जिल्ह्यात पायाभूत आराखडा योजना, एकात्मिक ऊर्जा विकास योजना, दीनदयाल उपाध्याय ग्रामज्योती योजनेत जिल्ह्यात सुमारे १०८४ कोटी रुपयांची कामे सुरु आहेत. यातील अनेक कामे पूर्ण झाली असून यातील अनेक कामे पूर्ण होण्याच्या मार्गावर आहेत. प्रलंबित असणारी कामे ३१ मार्च पूर्वी पूर्ण करण्याच्या सूचना यावेळी देण्यात आल्या. यामुळे आगामी काळात आगामी काळात जिल्ह्यातील वीज ग्राहकांना अखण्डित वीज पुरवठा मिळणार असल्याचे त्यांनी सांगितले.
भविष्यातील वाढती विजेची मागणी लक्षात घेऊन महावितरणने २०३०चे उद्दिष्ट समोर ठेऊन नियोजन करावे अशी सूचना यावेळी पालकमंत्री बावनकुळे यांनी केली. जिल्हा विदुयत नियंत्रण समितीची दरमहा बैठक घेऊन सुरु असलेल्या कामाची माहिती समितीच्या सदस्यांना देण्याचे निर्देश यावेळी दिले.
वीज ग्राहकांच्या तक्रारी दूर करण्यासाठी अधिकारी- कर्मचारी वर्गाने कामाच्या मुख्यालयी राहावे, जे अधिकारी-कर्मचारी मुख्यालयी राहत नाहीत अश्या कर्मचाऱ्यावर कठोर कारवाई निर्देश यावेळी त्यांनी दिले.
वीज ग्राहकांच्या तक्रारींचे निराकरण करण्यासाठी आपण जिल्ह्यातील प्रत्येक विधानसभा मतदार संघात पुन्हा जनता दरबार घेणार असल्याचे यावेळी ऊर्जामंत्री बावनकुळे यांनी सांगितले. बैठकीला आमदार विकास कुंभारे, कृष्ण खोपडे, सुधाकर कोहळे, सुधीर पारवे, मालिकार्जून रेड्डी, डॉ. मिलिंद माने यांच्यासह समितीचे सदस्य उपस्थित होते.
