Oops! It appears that you have disabled your Javascript. In order for you to see this page as it is meant to appear, we ask that you please re-enable your Javascript!
  | | Contact: 8407908145 |
  Published On : Thu, Mar 25th, 2021

  राज्यातील तब्बल १ लाख ९२ हजार शेतकरी वीजबिलांतून थकबाकीमुक्त

  msedcl

  नागपूर : कृषी ग्राहकांना विजबिलांतून थकबाकीमुक्त करण्यासाठी महावितरणकडून राबविण्यात येणाऱ्या महाकृषी ऊर्जा अभियानास राज्यभरातून सकारात्मक प्रतिसाद मिळत आहे. आतापर्यंत या थकबाकीमुक्ती योजनेत ८ लाख ६ हजार १०५ शेतकऱ्यांनी सहभाग नोंदविला असून गुरुवार (दि. २५)पर्यंत त्यातील १ लाख ९२ हजार ५२९ शेतकऱ्यांनी मूळ थकबाकीपैकी ५० टक्के रकमेचा भरणा करून १०० टक्के थकबाकीमुक्ती मिळविली आहे. या थकबाकीमुक्त शेतकऱ्यांना वीजबिलांतून तब्बल २५५ कोटी २ लाख रुपयांची सवलत मिळाली आहे.

  राज्यातील शेतकऱ्यांना कृषिपंपाच्या वीजबिलातून थकबाकीमुक्ती देण्यासाठी एकूण थकबाकीमध्ये तब्बल ६६ टक्क्यांपर्यंत सवलत देण्यात येत आहे. त्याप्रमाणे ४४ लाख ४४ हजार १६५ शेतकऱ्यांकडील एकूण ४५ हजार ७८७ कोटी १९ लाखांच्या एकूण थकबाकीमध्ये १० हजार ४२१ कोटी रुपयांची निर्लेखनाद्वारे सूट देण्यात आली आहे तर ४ हजार ६७२ कोटी ८१ लाख रुपयांची व्याज व विलंब आकारामध्ये सूट देण्यात आली आहे. या योजनेनुसार कृषी ग्राहकांकडे ३० हजार ६९३ हजार ५५ लाख रुपयांची सुधारित मूळ थकबाकी आहे. त्यापैकी पहिल्या वर्षात ५० टक्के थकबाकी भरल्यास वीजबिल कोरे करण्याची शेतकऱ्यांना संधी आहे. सोबतच शेतकऱ्यांच्या थकीत व चालू वीजबिलांद्वारे भरणा झालेली रकमेपैकी प्रत्येकी ३३ टक्के निधी हा संबंधीत ग्रामपंचायत व जिल्हा क्षेत्रात कृषी वीजयंत्रणेच्या सक्षमीकरण व विस्तारीकरणासाठी वापरण्याची तरतूद राज्याचे ऊर्जामंत्री ना. डॉ. नितीन राऊत यांच्या पुढाकाराने तयार झालेल्या कृषिपंप वीज धोरण- २०२० मध्ये प्रामुख्याने करण्यात आली आहे.

  सद्यस्थितीत राज्यातील १ लाख ९२ हजार ५२९ शेतकऱ्यांनी चालू व थकीत वीजबिलांपोटी ३३० कोटी ४२ लाख रुपयांचा भरणा करून वीजबिलांतून संपूर्ण थकबाकीमुक्ती मिळविली आहे. या शेतकऱ्यांनी सुधारित मूळ थकबाकीच्या ५० टक्के रकमेचा एकरकमी म्हणजे २५५ कोटी २ लाख रुपयांसह चालू वीजबिलांच्या ७५ कोटी ४० लाख रुपयांचा भरणा केला आहे. या सर्व शेतकऱ्यांना सुधारित मूळ थकबाकीमध्ये तब्बल २५५ कोटी २ लाख रुपयांची सूट मिळाली आहे. यामध्ये पुणे प्रादेशिक विभाग – ८४ हजार ४५५, कोकण प्रादेशिक विभाग- ६८ हजार ६७, नागपूर प्रादेशिक विभाग- ३० हजार २१९ आणि औरंगाबाद प्रादेशिक विभागातील ९ हजार ७८८ थकबाकीमुक्त शेतकऱ्यांचा समावेश आहे. या सर्व थकबाकीमुक्त शेतकऱ्यांना महावितरणकडून थकबाकीमुक्तीचे सन्मानपत्र देऊन गौरविण्यात येत आहे.

  राज्यभरात कृषी वीजबिल थकबाकीमुक्तीच्या महाकृषी ऊर्जा अभियानास चांगला प्रतिसाद मिळत आहे. आतापर्यंत ८ लाख ६ हजार १०५ शेतकऱ्यांनी थकबाकीमुक्तीसाठी या अभियानात सहभाग नोंदविला आहे. त्यांनी कृषिपंपाच्या थकीत व चालू वीजबिलांपोटी ७४१ कोटी ४ लाख रुपयांचा भरणा केला आहे. थकीत वीजबिलांतून मुक्ती व परिसरातील कृषी वीजयंत्रणेचा विकास साधणाऱ्या महाकृषी ऊर्जा अभियानात सर्व थकबाकीदार कृषी ग्राहकांनी सहभागी व्हावे, असे आवाहन महावितरणचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक श्री. विजय सिंघल यांनी केले आहे.


  Stay Updated : Download Our App
  Mo. 8407908145