
नागपूरमध्ये केंद्रीय मंत्रालयात उच्चपदस्थ अधिकारी असल्याचे भासवून काही ठकबाजांनी पाच जणांची तब्बल १ कोटी ९४ लाख रुपयांची फसवणूक केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. हा गुन्हा बेलतरोडी पोलिस ठाण्यात नोंदविण्यात आला आहे.
उज्ज्वल सोसायटी, नरेंद्रनगर येथील व्यावसायिक नामदेव कडू (६४) यांनी याप्रकरणी तक्रार दाखल केली आहे. त्यांच्या तक्रारीनुसार, रामचंद्र पाटील याने स्वतःला केंद्रीय मंत्र्यांच्या पीएचा सहायक असल्याचे सांगून त्यांच्याशी ओळख वाढवली. त्यानंतर त्याने देवेंद्र भार्गव याची ओळख करून दिली. भार्गवने स्वतःला केंद्रीय मंत्रालयात मंत्र्यांचा सचिव असल्याचे भासवले.
आरोपींनी रेल्वे, आयकर, पुरातत्त्व विभाग, नीती आयोग, एफसीआय आदी विभागांत आपले मजबूत संबंध असल्याचा दावा केला. सरकारी नोकरी, गॅस एजन्सी, पेट्रोल पंप किंवा सरकारी गोदाम मिळवून देण्याचे आश्वासन देत त्यांनी मोठ्या रकमेची मागणी केली.
नामदेव यांनी आपल्या मुलगा व मुलीसाठी नोकरी मिळवून देण्याच्या आशेने ७५ लाख रुपये दिले. त्यांच्या सांगण्यावरून आणखी चार नातेवाईकांनीही नोकरी व कंत्राटाच्या आमिषाला बळी पडून पैसे दिले. आरोपींनी एकूण १.९४ कोटी रुपये उकळले.
पैसे घेतल्यानंतर आरोपींनी बनावट नियुक्तीपत्रे आणि कंत्राटासंबंधी कागदपत्रे दिली. त्या कागदपत्रांवर सरकारी शिक्केही होते. मात्र तपासणीदरम्यान ती कागदपत्रे बनावट असल्याचे स्पष्ट झाले. पैसे परत देण्यास आरोपींनी नकार दिल्यानंतर नामदेव यांनी पोलिसांत धाव घेतली.
पोलिसांनी संबंधित आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल करून पुढील तपास सुरू केला आहे.








