मुंबई : दिवाळीच्या पाच दिवसांच्या सणांमध्ये भाऊबीज हा दिवस सर्वांत भावनिक आणि आत्मीयतेने साजरा केला जातो. कार्तिक शुद्ध द्वितीयेला साजरा होणारा हा सण म्हणजे भाऊ-बहिणीच्या नात्याचं प्रतीक. या दिवशी बहिण भावाला ओवाळते, त्याच्या दीर्घायुष्यासाठी प्रार्थना करते, तर भाऊ तिच्या प्रेमाची ओवाळणी आणि भेटवस्तूंनी तिच्यावर आपुलकीचा वर्षाव करतो.
भाऊबीज या सणामागे एक पौराणिक कथा सांगितली जाते. यमराजाची बहीण यमुना हिने भावाला जेवणासाठी घरी बोलावलं. यमराज तिच्या घरी गेला आणि तिच्या हातचं अन्न प्रेमाने खाल्लं. त्या दिवसाला ‘यमद्वितीया’ असं नाव देण्यात आलं. श्रद्धेनुसार या दिवशी स्नान करून यमपूजन केल्यास मृत्यूचं भय दूर राहतं आणि आयुष्य सुख-शांतीनं व्यतीत होतं.
या दिवशी बहिण आपल्या भावाला पाटावर बसवते, दिवा लावते आणि ओवाळणी करते. हळद-कुंकू, अक्षता, फुलं आणि गोड पदार्थांच्या दरवळात प्रेमाचा हा सोहळा खुलतो. त्यानंतर बहिण भावाला साजूक तुपाचं जेवण वाढते आणि भाऊ तिला वस्त्र, दागिने किंवा रोख भेटवस्तू देतो.
महाराष्ट्रात या सणाला भाऊबीज म्हणतात, तर उत्तर भारतात आणि नेपाळमध्ये याच सणाला भाईदूज किंवा भाई टीका म्हणतात. नाव वेगळी असली, तरी या दिवसाचं मूळ एकच आहे — बहिणीचं प्रेम आणि भावाचं रक्षण.
शास्त्रानुसार या दिवशी बहिणीमध्ये देवीतत्त्व जागृत होतं. बहिणीकडून ओवाळणी घेतल्याने आणि तिच्या हातचं अन्न खाल्ल्याने भावाला आध्यात्मिक लाभ मिळतो, असं मानलं जातं.
आजच्या काळात भाऊबीज केवळ घरापुरती मर्यादित नाही. अनेक सामाजिक संस्था आणि संघटना या दिवशी पोलीस, सैनिक, अग्निशमन दलाचे जवान, वृद्धाश्रमातील रहिवासी आणि देवदासी भगिनींना ओवाळून हा सण साजरा करतात. त्यामुळे हा दिवस समाजात बंधुभाव, कृतज्ञता आणि समतेचा संदेश देणारा ठरतो.
या दिवशी बहिण देवाजवळ हात जोडते.“माझा भाऊ सुखी राहो, दीर्घायुषी राहो, त्याच्यावर कोणतंही संकट येऊ नये.” हिच भावना प्रत्येक ओवाळणीमागे दडलेली असते. म्हणूनच भाऊबीज हा सण फक्त परंपरा नसून प्रेम, स्नेह आणि जिव्हाळ्याचं प्रतीक ठरतो.