Published On : Thu, Oct 15th, 2020

प्रोटोकॉल पाळा; स्वत:ची आणि कुटुंबीयांची काळजी घ्या!

Advertisement

कोव्हिड संवादच्या माध्यमातून डॉक्टरांचा सल्ला : मनपा-आय.एम.ए.चे आयोजन

नागपूर, : कोव्हिड चाचणी केल्यानंतर पॉझिटिव्ह आल्यास रुग्णांनी यासंदर्भात शासनाचे दिशानिर्देश पाळावे. आरोग्य विभागाने आखून दिलेल्या प्रोटोकॉलचे पालन करावे. स्वत:ची आणि कुटुंबीयांची काळजी घ्यावी, असा सल्ला कोव्हिड संवाद या फेसबुक लाईव्ह कार्यक्रमाच्या माध्यमातून डॉक्टरांनी दिला.

नागपूर महानगरपालिका आणि इंडियन मेडिकल असोशिएशनच्या संयुक्त विद्यमाने आयोजित ‘कोव्हिड संवाद’ फेसबुक लाईव्ह कार्यक्रमात गुरुवारी (ता. १५) अस्थिरोग तज्ज्ञ डॉ. राजेश सावरबांधे, बालरोग तज्ज्ञ डॉ. विपीन जैस्वाल आणि शासकीय वैद्यकीय महाविद्यालय चंद्रपूर येथील कम्युनिटी मेडिसीन विभागाचे विभागप्रमुख डॉ. चारुहास आकरे यांनी सहभाग घेतला. कोव्हिड काळातील अस्थिरोग आणि लहान मुलांची काळजी या विषयावर त्यांनी मार्गदर्शन केले आणि नागरिकांनी विचारलेल्या प्रश्नांना उत्तरे दिली.

लहान मुलांसंदर्भात विचारलेल्या प्रश्नावर बोलताना डॉ. विपीन जैस्वाल म्हणाले, कोव्हिड काळात लहान मुलांच्या लसीकरणाबाबत पालकांच्या मनात अनेक प्रश्न उपस्थित झाले. परंतु या काळात लसीकरण करण्यास काहीही हरकत नाही. फक्त ज्या डॉक्टरकडे बाळाला घेऊन जायचे आहे, त्यांची प्रथम अपॉईंटमेंट घ्या. गर्दी असताना दवाखान्यात जाणे टाळा. या काळात ज्या लहान मुलांना काही आजार आहे, त्यांची विशेष काळजी घेणे आवश्यक असल्याचे त्यांनी सांगितले.

सन २००३ मध्ये सार्स हा आजार आला होता. कोव्हिड आणि सार्स आजाराची लक्षणे सारखीच आहेत. मात्र, सार्समध्ये मृत्यूचे प्रमाण कोव्हिडच्या तुलनेत अधिक आहे. परंतु आता सार्सची लस उपलब्ध असल्यामुळे त्यावर नियंत्रण आणता आले. ती एक लस घेतली की सार्सचा धोका नसतोच. त्यामुळे कोरोनावर जेव्हा लस उपलब्ध होईल, तेव्हा कोरोनासुद्धा नियंत्रणात येईल, अशी माहिती डॉ. चारुहास आकरे यांनी दिली.

डॉ. राजेश सावरबांधे यांनी कोव्हिड रुग्ण रुग्णालयात आल्यावर काय प्रोटोकॉल पाळायचे असतात, याबाबत माहिती दिली. शक्यतो कोव्हिड रुग्णांवर उपचार करताना शस्त्रक्रिया टाळली जाते. कोव्हिड रुग्णांना अलगीकरण कक्षातच ठेवले जाते. त्यांच्या जाण्या-येण्याचा मार्ग आणि नॉन-कोव्हिड रुग्णांचा मार्ग वेगळा ठेवला जातो. कोव्हिड रुग्णांसाठी वापरलेल्या सामानाची योग्य विल्हेवाट लावणे गरजेचे असते. यावेळी त्यांनी कोव्हिडकाळात इंडियन मेडिकल असोशिएशनने केलेल्या आणि करत असलेल्या कार्याची सविस्तर माहिती दिली. इंडियन मेडिकल असोशिएशनने नागरिकांच्या मनातील भीती घालविण्यासाठी सतत जनजागरणावर भर दिला. स्वयंसेवी संस्थांना एकत्रित करून ऑनलाईन मीटिंगद्वारे चर्चा आणि मार्गदर्शन केले. जनआक्रोश संस्थेसोबत कोव्हिड व्हॅन तयार करून शहरभर जनजागृती केली. असेच जनजागृतीपर उपक्रम यापुढेही सुरू ठेवणार असल्याचे त्यांनी सांगितले.