Published On : Mon, Mar 16th, 2020

नागपूर साथरोग कायदा लागू : कलम १४४ ची नोटीस जारी

Advertisement

नागपूर : कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी आता पोलिसही सरसावले आहेत. त्यांनी साधरोग कायदा लागू करून कलम १४४ ची नोटीस बजावली आहे. त्यानुसार विविध कार्यक्रम, रॅली, प्रदर्शनाला आता पोलीस परवानगी मिळणार नाही. आयोजकांनी पोलिसांच्या परवानगीशिवाय गर्दीचे कार्यक्रम आयोजित केले तर त्यांच्यावर कडक कारवाई केली जाणार आहे.

कोरोनाचा प्रादुर्भाव होऊ नये यासाठी सरकारकडून आवश्यक त्या सर्व उपाययोजना केल्या जात आहेत. मॉल, चित्रपटगृहे, जीम, जलतरण तलाव बंद ठेवण्याचे आदेश देण्यात आले आहेत. नागरिकांची गर्दी झाल्यास कोरोनाचा प्रादुर्भाव होऊ शकतो, हे ध्यानात घेऊन गर्दी टाळण्यासाठी पोलिसांनीही प्रतिबंधात्मक उपाय केले आहे.

ज्या माध्यमातून लोकांची गर्दी होऊ शकते अशा कोणत्याही धार्मिक, सार्वजनिक, राजकीय, सांस्कृतिक कार्यक्रमांना, सभा, मेळावे, रॅलीलाही बंदी घातली आहे. पोलिसांकडून अशा कोणत्याही आयोजनास परवानगी दिली जाणार नाही. आयोजकांनी विना परवानगीने असे कोणतेही कार्यक्रम आयोजित केल्यास त्यांच्यावर कलम १८८ अन्वये कारवाई केली जाणार आहे. सहपोलीस आयुक्त रवींद्र कदम यांच्या स्वाक्षरीने हा आदेश आज नागपुरात जारी करण्यात आला आहे.