Published On : Fri, Jul 17th, 2020

नागपूर नागपुरात तूर्त ‘लॉकडाऊन’ नाही!

Advertisement

मनपा प्रशासनाचे संकेत

नागपूर : मुंबई, पुणे, ठाणे, नवी मुंबई यासह अन्य शहरात पुन्हा लॉकडाऊन करण्यात आले. त्यात लॉकडाऊन शिथिल झाल्यानंतर नागपुरात कोरोनाबधिताची संख्या झपाट्याने वाढत असल्याने नागरिकांनी निर्बंध न पाळल्यास पुन्हा लॉकडाऊन लावावे लागेल, असा इशारा मनपा आयुक्त तुकाराम मुंढे यांनी दिला. त्यामुळे नागरिकांमध्ये संभ्रम निर्माण झाला होता. मात्र शुक्रवारी अधिकाऱ्यांच्या बैठकीत आयुक्तांनी लॉकडाऊन हाच पर्याय नसल्याचे स्पष्ट करीत तूर्त लॉकडाऊन लागणार नाही, असे संकेत दिले.

नागपूर शहरात मागील काही दिवसात पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे. यासोबतच दररोज प्रतिबंधित क्षेत्रातही भर पडत आहे. नागरिकांनी जबाबदारीने वागावे, नियम व शर्तीचे पालन करावे. लॉकडाऊन लावणे तुमच्या हातात आहे, असे आवाहन आयुक्तांनी केले होते. महापौर संदीप जोशी यांनीही शहराच्या विविध भागात दौरा करून नागरिकांना निर्बंध लावण्यास भाग पाडू नका, असा इशारा देत नियमांचे पालन करण्याचे आवाहन केले. परंतु बाजारात, सार्वजनिक ठिकाणी ‘फिजिकल डिस्टन्स’ व निर्बंधाचे पालन होत नसल्याचे चित्र असल्याने नागपुरात पुन्हा लॉकडाऊन लागेल, अशी चर्चा सुरू झाली . यामुळे नागरिकांमध्ये संभ्रम निर्माण झाला. यामुळे अनेकांनी भ्रमणध्वनीवरून मनपा अधिकाºयांना लॉकडाऊन संदर्भात विचारणा केली. परंतु लॉकडाऊन लावायचे झाले तरी प्रशासनाला या संदर्भात आवश्यक ती तयारी करावी लागेल. पोलीस व अन्य विभागाची यंत्रणा सज्ज ठेवावी लागेल.

नियम पाळणे गरजेचे- राम जोशी, अपर आयुक्त, मनपा

‘मिशन बिगिन अगेन’अंतर्गत अनेक बाबतीत शिथिलता देण्यात आली. दुकानांचे दिवस ठरवण्यात आले. दिशानिहाय ऑड-इव्हन फॉर्म्युला ठरवून देण्यात आला. तरीही या नियमांचे पालन होताना दिसत नाही. त्यामुळेच आयुक्तांनी शहरातील नागरिकांना लॉकडाऊनचा इशारा दिला होता.

संसर्ग टाळण्यासाठी नागरिकांनी नियमांचे पालन करणे आवश्यक आहे. ते सर्वांच्या हिताचे आहे. लॉकडाऊन अंतिम पर्याय नाही. तूर्त लॉकडाऊन लावण्याचा विचार नाही.

शहरात अफवांचे पेव

राज्यातील मोठ्या शहरात पुन्हा कडक लॉकडाऊन लावण्यात आले आहे. त्यात नागपूर शहरात गेल्या काही दिवसात पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या वाढत असल्याने शहरात पुन्हा लॉकडाऊन लावले जाईल, अशा स्वरूपाच्या चर्चेचे पेव फुटले आहे.