Published On : Mon, Jul 13th, 2020

नागपुरात ७४ पॉझिटिव्ह, एकाचा मृत्यू, या वसाहतीत आढळले रुग्ण

Advertisement

नागपूर : जिल्ह्यात दिवसागणिक रुग्णांसोबतच मृत्यूची संख्या वाढत आहे. सोमवारी ७४ नव्या रुग्णांची नोंद तर सलग दुसऱ्या दिवशी एका रुग्णाचा मृत्यू झाला. रुग्णांची संख्या २,३५७ तर मृतांची संख्या ३७ झाली आहे. विशेष म्हणजे, मौदा तालुक्यात पहिल्यांदाच कोरोना रुग्णाची नोंद झाली. कामठीमध्ये १८ रुग्ण पॉझिटिव्ह आले. शहरातील इतर वसाहतींसोबतच झिंगाबाई टाकळी, ताजबाग, जुनी मंगळवारी येथे रुग्णसंख्या वाढताना दिसून येत आहे. नागपुरात मागील आठवड्यात १० तर या दोन दिवसात तीन असे १३ दिवसात १३ मृत्यूची नोंद झाली. आज मृत्यू झालेला रुग्ण हा रामेश्वरी येथील रहिवासी होता. ५१ वर्षीय या रुग्णाला पहाटे मेडिकलमध्ये दाखल करण्यात आले होते. गेल्या तीन दिवसापासून ताप व श्वास घेण्यास त्रास होत होता.

उच्चरक्तदाब व मधुमेहाचा आजारही होता. उपचार सुरू असताना रुग्णाचा मृत्यू झाला. मृत हा वनविभागात कार्यरत होता, अशी माहिती आहे. आज मेयोमधून १९, मेडिकलमधून चार, एम्समधून २४, नीरीमधून १७, खासगी लॅबमधून दोन, अ‍ॅण्टीजन चाचणीतून एक तर इतर प्रयोगशाळेतून सात असे ७४ रुग्ण पॉझिटिव्ह आले आहेत. सध्या मेयोमध्ये १०३, मेडिकलमध्ये १२२, एम्समध्ये ४५, कामठी रुग्णालयात ३२, खासगी रुग्णालयात २४, आमदार निवासातील कोविड केअर सेंटरमध्ये १८४ तर सेंट्रल जेल येथील कोविड केअर सेंटरमध्ये २१० रुग्ण उपचाराला आहेत. ४२ रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला असून, बरे झालेल्या रुग्णांची संख्या १५४५ झाली आहे.

या वसाहतीत आढळले रुग्ण

झिंगाबाई टाकळी पाच, वायुसेनानगर एक, पिवळी नदी एक, विनोबा भावेनगर एक, सुभेदार ले-आऊट एक, कस्तूरचंद पार्क एक, चिटणवीसपुरा एक, आग्याराम देवी परिसर एक, रामेश्वरी एक, भगवाननगर एक, दिघोरी आठ, नाईक तलाव एक, वाठोडा एक, महाल झेंडा चौक एक, जुनी मंगळवारी पाच, बजेरिया एक, ताजबाग सात, इंदोरा एक, सेंट्रल जेल येथून एक, गणेश टेकडी एक, गोकुळपेठ शंकरनगर एक असे ४५ रुग्ण पॉझिटिव्ह आले.

कामठीत १८ रुग्णांची नोंद, मौद्यामध्ये कोरोनाचा शिरकाव

कामठी ताल्युक्यात १८ रुग्णांची नोंद झाली. या तालुक्यात आतापर्यंत कोरोनाबाधितांची संख्या ६१ झाली. कामठी शहर ४९, येरखेडा येथे चार, भिलगाव येथे तीन, नांदा, कोराडी, महादुला, बिडगाव, रनाळा येथील प्रत्येकी एक रुग्ण आहे. मौदा तालुक्यातही आता कोरोनाचा शिरकाव झाला. एनटीपीसी पॉवर हाऊस येथे काम करण्याकरिता उत्तर प्रदेश राज्यातील बलिया जिल्ह्यामधून आलेल्या व्यक्तीचा अहवाल पॉझिटिव्ह आला.

संशयित : २,६२०
बाधित रुग्ण : २,३५७
घरी सोडलेले : १५४५
मृत्यू : ३७