Published On : Fri, Jul 10th, 2020

स्मार्ट सिटी सीईओपदी आता उपमुख्य कार्यकारी अधिकारी महेश मोरोने

नागपूर: मनपा आयुक्त तुकाराम मुंढे यापुढे स्मार्ट सिटीच्या सीईओपदी राहणार नसून त्याजागी उपमुख्य कार्यकारी अधिकारी महेश मोरोने हे कामकाज पाहतील असा निर्णय येथे झालेल्या संचालक मंडळाच्या बैठकीत घेण्यात आला.

महापौर संदीप जोशी आणि सत्ता पक्षनेता संदीप जाधव यांनी संचालक मंडळाच्या इतर संचालकांना पत्र पाठवून कायद्याच्या अधीन राहून निर्णय घ्यावा, असे आवाहन केले होते. तिकडे बैठकीच्या पार्श्वभूमीवर आयुक्त मुंढे यांनीही अधिकाऱ्यांची बैठक घेऊन तयारी केली होती. महापालिकेतील आयुक्त विरुद्ध सत्ताधारी असा संघर्ष टोकाला गेला आहे.

स्मार्ट सिटीचे सीईओ नसताना आयुक्तांनी या पदाचे अधिकार वापरले. २० कोटींची देयके चुकवल्याचेही सत्तापक्षाकडून आरोप झाले. दरम्यान, महापौर संदीप जोशी यांनी आयुक्त मुंढे यांच्या स्मार्ट सिटीच्या गैरकारभाराची चौकशी व्हावी, अशी याचिका न्यायालयात दाखल केली आहे. परंतु, आयुक्तांनी केलेल्या कामांचे राज्य शासनाकडून कौतुकही केले जात आहे